अबकारी कर विरोधात सराफ व्यावसायिकांचा तीव्र संघर्षाचा इशारा

पुणे, दि. १९ – सोन्याच्या दागिन्यांवरील अबकारी कर (सेंट्रल एक्साईज टॅक्स) आणि मजुरीवरील सेवा कर रद्द केला नाही तर, सराफी व्यावसायिक रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध तीव्र संघर्ष करतील, असा इशारा महाराष्ट* राज्य सराफ महामंडळाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला. स्थानिक सराफी व्यावसायिकांना डावलून बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोकळी वाट करुन देण्यासाठीच शासनकर्ते सराफी व्यावसायिकांवर कडक निर्बंध लादत आहे, अशी टीका त्यांनी केली.
  सोन्यावरील अबकारी कर लागू केल्याच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांनी देशव्यापी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. बंदच्या दुसर्‍या दिवशी महाराष्ट्र राज्य सराफ महामंडळाच्या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी या आंदोलनाची स्थिती आणि सेंट्रल एक्साईज कराविषयीची विस्तृत माहिती दिली. सुरेंद्र पुरवंत, विजय ओसवाल, अशोक वारेगावकर, सुधाकर टाक, गिरीश देवरमणी, अनिल वाघाडकर, सुभाष मुथ्था, अशोक भावसार, नरेंद्र कोठारी या महामंडळाच्या उपाध्यक्षांसह पदाधिकारी आणि राज्यातील सराफ व्यावसायिक या बैठकीला उपस्थित होते.
अबकारी कराविषयी माहिती देताना फत्तेचंद रांका म्हणाले, दीड कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या सराफांना अबकारी कर द्यावा लागणार नाही. परंतु, आपला व्यवसाय दीड कोटी रुपयांहून अधिक झाल्यास एक्साईज रजिस्ट्रेशन गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारच्या मजुरीवर १२ टक्के सेवा कर जुलैपासून लागू होणार आहे. त्याचप्रमाणे दोन लाख रुपयांहून अधिक रकमेचा रोखीचा व्यवहार झाल्यास एक टक्का टीडीएस कापून घ्यावा लागणार आहे. या सार्‍या कटकटींमुळे सराफांचे कारकुनी काम वाढणार आहे. आपण सोन्यासारख्या व्यवसायामध्ये आहोत तर, आपल्याला संगणकाचे ज्ञान संपादन करणे गरजेचे आहे. व्हॅट, आयकर रिटर्न्स, सेवा कर या सार्‍या बाबी इंटरनेटच्या माध्यमातून होत असल्याने आपण हे सारे अवगत केले पाहिजे. काळ्या पैशांचे उत्पन्न रोखण्यासाठी आणि सोन्या-चांदीच्या व्यवसायातून सावकारी वाढते या भूमिकेतून सरकारने सराफ व्यवसायावर ही बंधने घातली आहेत. वेगवेगळ्या करांमुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ होणार आहे.
  आपण संघटनेच्या पातळीवर केंद्र सरकारशी चर्चा करीत आहोत. मात्र, सरकारकडून आपल्या विविध प्रश्नांसदर्भात खुलासा येईपर्यंत वेळ लागणार आहे. त्यामुळे सराफांनी सेंट्रल एक्साईज विभागाची कारवाई होऊ नये यासाठी रजिस्ट्रेशन करणे जरुरीचे आहे. ज्यांची एकपेक्षा अधिक दुकाने आहेत त्यांनी प्रत्येक दुकानासाठी स्वतंत्र रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य सराफ महामंडळाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावून महत्त्वाच्या मुद्यांचे निराकरण करण्यात येणार आहे, असेही फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
ज्यांची उलाढाल दीड कोटी रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनी अबकारी करातून आपली सुटका झाली याचा आनंद मानू नये. याचे कारण म्हणजे दररोज १५ ग्रॅम सोन्याची विक्री झाली तरी व्यवसायाची उलाढाल दीड कोटी रुपये होते. त्यामुळे आज ज्यांना अबकारी करातून सूट मिळणार आहे ते कदाचित पुढच्या वर्षी उलाढाल वाढल्याने हा कर भरण्यासाठी पात्र ठरतील, असे एका सराफ व्यावसायिकाने सांगितले.