पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या वैशाली बनकर

पुणे दि.१५-पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या वैशाली बनकर यांची निवड झाली असून उपमहापौरपदी काँग्रेसचे दीपक मानकर विजयी झाले आहेत. वैशाली बनकर या प्रथमच नगरसेवक होत आहेत. त्या सभागृहात निवडून येताच त्याना महानगराची पहिली नागरीक होण्याचा मान मिळाला आहे. यावेळचे महापौरपद ओबीसीसाठी राखीव होते त्यामुळे त्याना ते मिळाले. त्यांचे सासरे दत्ता बनकर हेही पूर्वी महापालिकेत नगरसेवक होते.
  वैशाली बनकर यांना ८२ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या वर्षा तापकीर यांना ४१ मते मिळाली.  उपमहापौरपदी विजयी झालेल्या दीपक मानकर यांनाही ८२ तर त्यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले शिवसेनेचे विजय देशमुख यांना ४१ मते मिळाली.  राष्ट्रवादी आणि काँग्रेसने निवडणुकांनंतर आघाडी केल्याने व मनसेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने महापौरपदाची निवडणुक म्हणजे केवळ औपचारिकताच राहिली होती. वैशाली बनकर या ५२ व्या महापौर ठरल्या असून महापौरपद मिळविणार्‍या त्या सातव्या महिला आहेत.
   या निवडणुकीत राष्ट्रवादीने ५१ तर काँग्रेसने २८ जागांवर विजय मिळविल्याने आणि निवडणुकांनंतर त्यांनी आघाडी केल्याने त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत होते. परिणामी २९ जागा मिळविणारा मनसे हा सर्वात मोठा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला होता. मनसे विरोधी पक्ष म्हणून काम करणार असून विरोधी पक्षनेतेपदी वसंत मोरे यांची कालच निवड करण्यात आली आहे. महापौर उपमहापौर निवडीने  पुणे महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात आले आहे. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण मंजूर झाल्यानंतर पहिल्या महिला महापौर म्हणून काँग्रेसच्या कमल व्यवहारे यांची निवड झाली होती. त्यानंतर सलग तीन वेळा महिलाच महापौर बनल्या होत्या.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महापौरपद सव्वा सव्वा वर्ष देण्याचा निर्णय घेतला असल्याने वैशाली बनकर या कदाचित त्यांचा अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण करू शकणार नाहीत असे सांगण्यात आले.