पुणे, दि. १३ – साखर उत्पादनात जगातील अग्रगण्य उत्पादक देशातील भारताचे स्थान कायम ठेवायचे असेल तर साखर उद्योगाच्या गुणात्मक वाढीकडे अधिक लक्ष देण्याचे आवश्यकता आहे आणि त्यासाठी यांत्रिकीकरणा शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन माजी साखर आयुक्त वि.पां. राणे यांनी केले.
डेक्कन शुगर टेकनॉलॉजिस्ट असोशिएशन (डीएसटीए) च्या वतीने आयोजीत साखर कारखाना सहविजनिर्मिती व डीस्टीलरी मधील स्वयंचलीत प्रणाली’ या विषयावरील परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी राणे बोलत होते. यावेळी डीएसटीएचे अध्यक्ष आमदार व्ही.जी. शिदे, उपाध्यक्ष आर.व्ही. शिरगावकर, ए.एस. अष्टेकर, पी.एन. आर. राव, आर.सी. महाबळेश्वरकर, व्ही.डी. खोत, एम. आर. कुलकर्णी, सोमनाथ केळकर, प्रतापराव देशमुख आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, यांत्रिक बदलांखेरीज आपला साखर उद्योग पुर्ण क्षमतेने कार्य करू शकणार नाही. जगात साखर उत्पादनामध्ये आपला दुसरा क्रमांक लागतो तो टिकविण्यासाठी देखील यांत्रिकीकरणात सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता आहे. आज आपण साखर उत्पादनात चीनच्या पुढे आहोत मात्र चीनचे संशोधक विविध देशात जाऊन त्यांच्यात गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. आपल्या देशात देखील गुणात्मक बदल झाला तरच आपण स्पर्धेत टिकू अन्यथा मागे राहू.
