विदर्भातील धरणांमध्ये ४२ टक्के पाणी

 नागपूर, दि. १० – उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यासह विदर्भातही पाणी संकट गहिरे बनले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पाणी साठ्यात १४ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. यावर्षी राज्यात ४४ तर विदर्भात फक्त ४२ टक्के साठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा राज्यभरात अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार असून अनेक ठिकाणी पाणी कपातीचे संकट उभे ठाकण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
  हवामानाच्या लहरीपणाचा फटका यंदा राज्यातील जनतेला सहन करावा लागणार आहे. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने राज्यातील धरणांमध्ये केवळ ८९ टक्केच पाणीसाठा होऊ शकला. यासंदर्भात ऑक्टोबर २०११ मध्येच धरणसाठ्यांचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यानंतरच्या काळात पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी या पाण्याचा वापर होऊन वर्तमानात राज्यात ४४ आणि विदर्भात ४२ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. याउलट गेल्यावर्षी याच काळात राज्यातील धरणांमध्ये ५८ टक्के तर विदर्भातील धरणात ५६ टक्के पाणीसाठी शिल्लक होता. मात्र, यंदा पर्याप्त पावसाअभावी पाणीसाठ्यात १४ टक्क्यांची घट झाली आहे.
  राज्यभरात सर्वात विदारक चित्र मराठवाड्याचे असून येथील धरणांमध्ये केवळ ३२ टक्के पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यातील निम्न तेरणा धरण पूर्णपणे कोरडे पडले असून, विष्णुपुरी धरणात फक्त ९ टक्के पाणी शिल्लक आहे. तर मनार धरणामध्ये केवळ १८ टक्के आणि परिसरातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात केवळ २४ टक्के पाणीसाठी उरलेला आहे. नागपूरमधील धरणांत केवळ ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील नांद, वाघ, कालिसरार आणि दिना या धरणात शून्य टक्के पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे. तर तोतलाडोह ४०, कामठी खैरी-६४, रामटेक-१० आणि वडगाव धरणात २५ टक्के पाणी शिल्लक आहे.