ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; कोरोनासंदर्भात येत्या दोन आठवड्यात देणार GOOD NEWS


वॉशिंग्टन – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकट काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कोरोनावरील उपचारासंबंधी आपल्या प्रशासनाकडून एका चांगल्या बातमीची घोषणा आगामी दोन आठवड्यांमध्ये करण्यात येईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे.

मी तुम्हाला रोगनिवारण व औषधोपचार यांचा आदर ठेवत सांगू इच्छितो की, आमच्याकडे पुढील काही आठवड्यांमध्ये सांगण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी असणार आहेत, असे पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरुन पुढील दोन आठवड्यात अमेरिका काही महत्त्वाची आणि मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरसविरोधात मॉर्डना कपंनीने विकसित केलेल्या लसीची अंतिम टप्प्याची चाचणी अमेरिकेत सुरु होत असतानाच हे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ३० हजार स्वयंसेवकांवर या टप्प्यात चाचणी करण्यात येणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ-अस्त्राझेनेका आणि दोन अन्य चिनी कंपन्यांच्या पंक्तीत मॉर्डना कंपनी सहभागी होणार आहे.

या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु झाली आहे. मॉडर्नासाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण या टप्प्यात एकाचवेळी मोठया प्रमाणावर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या टप्प्यातील निकालावर बरंच काही अवलंबून असेल. यामधून लसीची नेमकी परिणामकारकता, उपयोगिता सिद्ध होईल.