अमेरिका खंडामधील एका देशाच्या राष्ट्रपतींनी घेतली वेदमंत्रांचा उच्चार करून शपथ


नवी दिल्ली – आपल्या देशातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे जगभरातील इतर देशांमध्ये स्थलांतर झाले आहे. त्याचबरोबर स्थलांतर केलेल्या या नागरिकांनी जैसा देस वैसा भेस अशीच संस्कृती आत्मसात केली आहे. पण याला एका देशाचे राष्ट्रपती अपवाद ठरले आहेत. नुकतेच भारतीय वंशाचे चंद्रिका प्रसाद संतोखी हे अमेरिका खंडामधील एक देश असलेल्या सुरीनाममध्ये राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. दरम्यान, संतोखी यांनी राष्ट्रपतीपदावर विराजमान होताना हातात वेद घेऊन मंत्रोच्चार करत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान या घटनेचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमात केला.

आजच्या मन की बात कार्यक्रमात मोदी म्हणाले की, सुरीनामचे चंद्रिका प्रसाद संतोखी हे नवे राष्ट्रपती बनले आहेत. ते भारताचे मित्र आहेत. त्यांनी २०१८ साली झालेल्या पर्सन ऑफ इंडियन ओरिजन पार्लियामेंट्री कॉन्फ्रन्समध्ये भाग घेतला होता. वेद मंत्रांच्या साक्षीने त्यांनी शपथेची सुरुवात केली आणि संस्कृत भाषेत शपथ घेतली.

प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टीचे चंद्रिकाप्रसाद संतोखी हे नेते असून देशातील लष्करशाहा डेसी बॉउटर्स यांची जागा त्यांनी घेतली आहे. मे महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये बॉऊटर्स यांचा नॅशनल पार्टी ऑफ सुरीनाम पराभूत झाला होता. दरम्यान, संतोखी यांनी अशावेळी देशाच्या राष्ट्रपतीपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. ज्यावेळी देशाचे नेदरलँड्ससह इतर पाश्चात्य देशांशी असलेले संबंध बिघडले आहेत. तसेच देश यावेळी खूप मोठ्या संकटातून जात आहे.