जादूटोणाविरोधी विधेयक -हे तर भारतीय शास्त्रांना मागे रेटण्याचे षडयंत्र

महाराष्ट्राच्या विधीमंडळात या आठवडयात जादूटोणाविरोधाच्या नावाखालील विधेयक मांडले जाणार आहे.हे विधेयक मांडणारांचा सर्वात मोठा आक्षेप हा ज्योतिषशास्त्रावर आहे. भारतीय ऋषीमुनींनी काही हजार वर्षापूर्वी सूर्यमंडलाला व्यापणार्‍या नक्षत्र मंडलाच्या सायको सोमॅटिक परिणामाचा वेध घेतला होता हे लक्षात घेण्याची मानसिकता त्यातील मंडळींची नाही. पण लोकप्रतिनिधींना तो विषय समजावून सांगण्याची पराकाष्ठा करावी लागेल कारण या कायद्यान्वये भारतीय शास्त्रांची प्रयोगशीलताच पाखंड ठरण्याची शक्यता आहे.
जादू टोणा नियंत्रण विधेयकातून या समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्याच्या नावाखाली भारतीय भूमीवर गेल्या काही हजार वर्षात निर्माण झालेल्या सर्व शास्त्रांना बेकायदा व समाजघातक ठरविण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्याला तो विषय विधीमंडळात मान्यतेच्या शेवटच्या महत्वाच्या टप्प्यात असल्याने त्याला सर्वशक्तीनिशी विरोध करण्याची गरज आहे. या विधेयकामुळे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अजून काही हजार वर्षे मागे जाणार आहोत. ज्यांना भारतीय शास्त्रे म्हणजे फक्त धार्मिक पाखंड वाटते त्यांना हा समजून सांगायला या शास्त्रातील माणसेच कमी पडली आहेत हे त्याचे खरे कारण आहे. कालपर्यंत योग आणि आयुर्वेद यांचाही समावेश या पाखंड शास्त्रांच्या यादीत व्हायचा. अजूनही जे विषय पुढे आले आहेत ते त्या त्या शास्त्रांच्या व्याप्तीच्या तुलनेत पाच सहा टक्केच आहे. कदाचित त्याचे श्रेय आज आपण स्वामी रामदेव यांना देवू पण शंभरवर्षापूवीं महाराष्ट्रात स्वामी कुवलयानंद यानी हे प्रयोग करून भारतीय शास्त्रांना पाश्चात्य कसोट्यांना उतरविण्यास प्रारंभ केला. रामदेव बाबा यांनी तर केलेल्या असामान्य कामामुळे त्याची क्षितिजे सर्वत्र विस्तारली. अर्थात हा एक दोन नावाच्या उल्लेखाने संपणारा विषय नाही. पण आज जगभर शंभर कोटी लोक त्या विषयाला प्राथमिक पातळीवर का होईना परिचित झाले हा त्याचा परिणाम महत्वाचा मानावा लागेल. अजून भारतीय पातळीवरील ते अधिकृत शास्त्र असे त्याच्या मान्यतेचे स्वरुप नाही. पण ते नसण्यानेही फारसे बिघडण्याचे कारण नाही. त्याला आवश्यक तो काळ व कसोट्या यांच्या मर्यादा ओलांडाव्याच लागतील. पण तुलनेत विचार केला तर ज्योतिष शास्त्र, भाषाशास्त्र, संगीत शास्त्र आणि भारतीय इतिहासातील व परंपरेतील जी काही शास्त्रे आहेत ती अजून त्या कसोटयापर्यंत पोहोचलेली नाहीत. कदाचित भाषाशास्त्र व संगीत शास्त्र यांच्या यांच्यावरील शास्त्रीय प्रयोगांना थोडीफार सुरुवात झाली आहे पण ज्योतिष शास्त्रावर शास्त्रीय प्रयोगांना आरंभच झाला नसल्याने तो शास्त्र फार अजून भाकडकथांच्या आणि पाखंडाच्या आरोपातून बाहेर येवू शकलेले नाही. अर्थात याला त्यावर प्रयोग करणारे व त्यांच्या शास्त्रीय दृष्टीकोनाचा आग्रह यांचा आग्रह धरणारेच कमी पडले आहेत हे विसरता कामा नये. मराठीत भगवद्गीतेची ज्ञानेश्वरी व्हायला किती हजार वर्षे लागली, त्याची कारणे काय काय होती आणि त्यासाठी कोणाला किती असह्य यातना सहन कराव्या लागल्या याची महाराष्ट*ाला कल्पना आहे. त्यामुळे ज्या कोणाला भारतीय शास्त्रांच्या आजच्या म्हणजे एकविसाव्या शतकात सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना त्या कसोट्यातून जावे लागेल.
सर्वात मोठा आक्षेप ज्योतिष शासत्रावर
    भाषाशास्त्र, संगीतशास्त्र यांच्यावरील प्रयोगाला आज कोठे कोठे का होईना सुरुवात झाली आहे. पण ज्योतिषशास्त्र हे अजून शास्त्र म्हणून तर सोडाच पण जो धर्मग्रंथ हा मानवी प्रयत्नाचे असमान्य सामर्थ्य याचा आत्मविश्वास देण्याऐवजी गुरुची कृपा आणि शनीची अवकृपा यांच्या कोड्यात अडकवून केवळ दैववादी बनवत असेल तर ते शास्त्र शंभर टक्के खरे असूनही हातातही घ्यायचे का याचा विचार करावा, असे स्वामी विवेकानंद यांच्यापासून अनेक विचारवंतांनी सांगितले आहे आणि ते बरोबरच आहे. आजही या ज्योतिषशास्त्राने या देशाचे वाटोळे केले असे मानणारांची संख्या फार मोठी आहे त्यांच्या निष्कर्षाशी अनेकजण सहमत असले तरी ते चूक म्हणता येणार नाही. आज या शास्त्राचा येवढाच परिणाम शिल्लक राहिला आहे की, जुन्या ज्योतिषग्रंथावर त्यातील अतिशय जाणकार अभ्यासकांनी विश्लेषण केले तर ते शास्त्र बरोबर आहे असे वाटते व आपापल्या जीवनात पटतेही. अर्थात असा प्रकार वारंवार होअूनही शंभर टकके सत्य वाटला तरीही कोणत्याही विज्ञानाच्या कसोटीवर टिकणार नाही आणि टिकूही नये. जे शास्त्र सर्व भारतीय शास्त्रांचे शिखरशास्त्र नानले जाते अशा ज्योतिषशास्त्राची कसोटी फक्त‘पटते किवा पटत नाही’ येवढीच राहिली आहे हे यातील सर्वात दुर्दैव आहे. गेल्या पाचशे वर्षात पाश्चात्य जगात विज्ञानाच्या संशोधनाची काही परिमाणे निश्चत झाली आहेत. त्यातून विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी प्रचंड मोठी झेप घेतली आहे. त्यातूनच निर्माण झालेले संगणकशास्त्र, नॅनोशास्त्र आणि स्टेमसेल शास्त्र यांनी पुढच्या शतकासाठी ही क्षितिजे तयार करून ठेवली आहेत त्याने आश्चर्य चकीत व्हायला होते. पण मग सर्व भारतीय शास्त्रांचे शिखर शास्त्र असा दावा करणार्‍या ज्योतिषशास्त्राला त्याच्या आजुबाजूलाही उभे करण्याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही, इतकी भयावह स्थिती का असावी. याचे सकृतदर्शनी कारण असे वाटते की, ज्योतिषावर जे काम झाले तर फक्त फलज्योतिषावर झाले आणि त्याला प्रयोग म्हणून प्रत्यक्ष ग्रह, तारे आणि नक्षत्रे यांचा वेध घेण्याऐवजी फक्त जुन्या ग्रंथातील फलादेशावरच भागवले गेले.
भारतीय ज्योतिषशास्त्र प्रामुख्याने सूर्यमंडळातील ग्रह आणि नक्षत्रे यांचा विचार करते. यातील एक गोष्ट निश्चत आहे की, त्यांच्या ज्या गती आहेत या त्यांच्या त्यांच्या गुरुत्वाकर्षणाने निश्चत झाल्या आहेत. वास्तविक हा विषय मांडायला आवश्यक अशी संज्ञासंकल्पनाही तयार आहे पण त्यामुळे तो विषय गहन वाटण्याच्या भीतीने ती टाळत आहे. या सर्वांची गती निश्चत आहे आणि ती परस्परांच्या गुरुत्वाकर्षणाने निश्चत झाली आहे. त्याचा फक्त जसा गुरुत्वाकर्षाच्या सामर्थ्याने विचार होअू शकतो त्याच प्रमाणे गुरुत्वाकर्षणायेवढेच अन्य जे परिणाम असतात याचा वेध जर कोणी घेतला असेल तर तोही तेवढाच शास्त्रीय असू शकेल असे हायपॉथिसिस म्हणजे गृहीतके म्हणून मानायला काय हरकत आहे. आजचे विज्ञान कोणत्याही दोन गोष्टीतील सायकोसोमॅटिक इफेक्ट मान्य करते. म्हणजे कोणत्याही दोन गोष्टीचा एकमेकावर पदार्थविज्ञानाच्या आधारे परिणाम होतच असतो. आणि जो परिणाम पदार्थ विज्ञानाचा असतो तोच परिणाम अन्य विज्ञानाच्या कसोट्यातही येतो आणि मनोव्यापार व कृती व्यापार हा त्याचाच परिणाम असतो. अर्थात ज्याचे पदार्थविज्ञानाच्या क्षमतेनुसार जसे जसे सामर्थ्य असणार तसाच त्याचा परिमाणही असणार. सूर्य हा मुख्य तारा असल्याने त्याचा पदार्थविज्ञानाच्या आधारे व बर्‍याच अंशी मनोव्यापार आणि कृती व्यापार यांच्यावर झालेला परिमाण दिसू शकतो. त्यातूनच पहाटेचा परिणाम आणि रात्रीचा परिणाम निराळा असतो हे स्पष्ट होतानाही दिसते. पण तारे, ग्रह आणि नक्षत्रांचे हे महामंडल केवळ नियमाने बांधले गेले आहे असे नसून महाप्रचंड सामर्थ्याने बांधले गेले आहे हे ज्यांच्या लक्षात आले असेल त्यांनी जर त्यावर केलेली निरीक्षणे आणि अभ्यास हे कोणत्याही स्थितीत अभ्यासाचे विषय न होण्याचे कारण नाही. सध्या जी मंडळी यावर काम करताना दिसतात ती मंडळी अडले नडले तर आकाशातील ग्रह तार्‍यांच्या गतीच्या परिणामाचा संदर्भ देतात. बाकी सारे जुन्या ग्रंथावरच भागवतात.
भारतीय शास्त्रांचे एकजिनसित्व
    अर्थात ऋषीमुनींनी शोधलेले हे शास्त्र केवळ पुराव्यानिशी सिद्ध करण्याच्या कसोटीपुरते मर्यादित नाही. त्याला हाताळणारे त्याची टपरी टाकण्याच्या पलिकडे फारसे जाअू शकलेले नाहीत ही त्यातील समस्या आहे. ही बाब केवळ ज्योतिषशास्त्राची नाही, प्रत्येक भारतीय शास्त्राची हीच स्थिती आहे. एक हजार वर्षापूर्वी येथे गझनीच्या महंमदाचे आक्रमण झाले तेंव्हापासून आक्रमकांच्या धर्मग्रंथाखेरीज कोणतेही धर्मग्रंथ टिकणे अशक्य झाले पाचशे वर्षे येथील शास्त्रीय ग्रंथ, धर्मग्रंथ यांच्या पोथ्या जळत होत्या. अशा प्रतिकूल काळात त्या त्या वेळच्या जाणकारांनी ही शास्त्रे टिकवण्याचे जे मार्ग निर्माण केले त्यातून त्याचे आजचे स्वरुप आले असावे.
    वास्तविक भारतीय शास्त्रांचे स्वरूप असे आहे की, योग, आयुर्वेद ,संगीत,भाषा, कृषीशास्त्र अशी जी काही कोणाच्या परिभाषेत चौदा तर कोणाच्या परिभाषेत वीस शास्त्रे आहेत त्या सर्वांबाबत एक गोष्ट निश्चत आहे की, त्यांची परिभाषा एकजिनसी आहे. त्रिदोष सिद्धांत, पंचमहाभूत सिद्धांत आणि सप्तधातू सिद्धांत हा या सर्व शास्त्रांना हाताळण्याचा ‘की बोर्ड’ आहे तो ‘की बोर्ड’ संगणकाच्या की बोर्डापेक्षाही हाताळायला सोपा आहे. पंचवीस वर्षापूर्वी संगणक तंत्र जसे आले व पाश्चात्य विश्वातही भारतीय शास्त्राबाबत आवड निर्माण झाली त्याच्या अभ्यासनंतरच मला या सर्व शास्त्रातील असामान्य एकजिनसीपणाची जाणीव झाली. मी काही त्यातील शास्त्रज्ञ नाही पण वीस पंचवीस शब्दाच्या आधारे आज संगणकाला अप्राप्य वाटावी अशी शास्त्रांची मांडणी येथे झाली आहे. संगणकाला जेवढी संस्कृत भाषा आपलीशी वाटली तेवढीच भारतीय शास्त्रेही जवळची वाटली ही वस्तुस्थिती आहे. संगीत, भाषा यांच्या परिभाषा समजून घेत मी जसा ज्योतिष आणि फलज्योतिष यांची परिणभाषा समजून घेअू लागलो. तेंव्हा शंभर टक्के अचूक निर्णय देणार्‍या तामिळी ज्योतिषशास्त्राने मला अधिक प्रभावीत केले. याबाबत आश्चर्य व्यक्त करायला मी एकदा संगणक तज्ञ डॉ विजय भटकर यांच्याकडे गेलो तर त्यांनी नक्षत्र अभ्यासकांचा आणि त्यातील जुन्या ग्रंथांचा अभ्यास करणार्‍या अशा जाणकारांचा परिचय करून दिला की, जगातील शतकानुशतकांतील प्रत्येक घटना ही नक्षत्रमालिका मॉनिटर करते की काय असे वाटावे.
एक हजार वर्षच्या परचक्राचा परिणाम
    या विषयावर विश्वास ठेवावा की ठेवू नये, हा ज्याच्या त्याच्या पिडप्रकृतीचा विषय आहे. ज्योतिष बघण्याने माणूस प्रयत्नवादी न होता दैववादी होतो असे वाटून ते शास्त्र न वापरण्याच्या यादीत ढकलण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्या वर हेत्वारोप करण्यातही काही अर्थ नाही पण त्यावर बंदी घालणे किवा तो विषय हाताळणे हा गुन्हा समजणे ही पूर्णपणे तालिबानी वृत्ती आहे. गेल्या एक हजार वर्षातील आठशे वर्षे येथे तालिबानचीच सत्ता होती.नंतरच्या दोनशे वर्षात ब्रिटिशांना तर ते नकोच होते. पण स्वातंत्र्याच्या चौसष्ट वर्षानंतरही तीच स्थिती असावी हे दुर्दैव आहे. अर्थात गेल्या एक हजार वर्षातील पारतंत्र्य अजून गेलेले नाही, अशी अनेक कारणे दिसत असल्याने ज्या कोणाला आपल्या वाडवडिलांनीच तयार केलेला वारसा म्हणून असलेली शास्त्रे टिकवायची असतील त्याना ती किमत मोजावी लागेल. यातील ज्योतिषशास्त्राचा उपयोग फक्त नैराश्य वाढविण्यासाठीच होतो असे जर कोणाला वाटत तर ते चूक आहे. रामदेव बाबा गेली दहा वर्षे करत असलेल्या योगाभ्यास प्रचाराचा उपयोग केवळ रोग दुरुस्त करण्यासाठीच आहे असे सकृतदर्शनी वाटेल पण पतंजलींची योगसूत्रे जर बघितली तर मानवी विकासाच्या परिसीमेची कल्पना येते. आयुर्वेदाचा आज उपयोग होताना दिसतो आहे तो केवळ पुड्या बंाधून औषध देताना दिसतो आहे. तोही कमी आहे असे नाही. पण त्रिदोष साम्यतेतून माणसाचा होणारा विकास ही पुढची कल्पना आहे. भारतीय संगीत हे आज केवळ मनोरंजनातून वापरले जात आहे. याची आरंभ कथा जी सांगितली जाते ती त्याची सुरुवात हनुमानाने केली आहे अशी आहे आणि योग, आयुर्वेद यांच्या प्रमाणेच संगिताचेही साध्य हे साम्यत्वाकडे जाण्याचे आहे. भारतीय ज्योतिष आज प्रश्न कुंडली, साडेसाती, मुलीला मंगळ, मुलाची नोकरी, करणी, उतारे यात अडकले आहे. एकविसाव्या शतकाला न चालणारी अशी अजून एक बाब यात आहे ती म्हणजे त्याची या शास्त्रांची झालेली अस्तिक्यातून निर्मिती. एकविसावे शतक अस्तिक्य अमान्य करत बसणारे नाही पण ते मान्य करणारेही नाही. त्यामुळे सर्व भारतीय शास्त्रांना यापुढे नास्तिक्याच्या कसोटीवर टिकावेच लागेल.ते करताना अस्तिक्य जर प्रामाणिक असेल तर नास्तिक्याच्या कसोटीवर सिद्ध करणे अशक्य नसते. गेली काही वर्षे जगभर अग्निहोत्राचा प्रचार सुरु आहे. त्याचे याज्ञिक स्वरुप एकविसाव्या शतकातील विज्ञानाच्या कसोटीला मान्य होईल असे नाही पण त्याचा परिणाम जर मोठ्या प्रमाणावर दिसणार असेल तर प्रत्यक्ष यज्ञयाग न करता ही गायीचे शेण व तूप यातूनही तो परिणाम साधायचा प्रयत्न करणारांची संख्या पुढे येईल. 
जादू टोणाविरोधी विधेयकाचे खरे आव्हान आहे ते भारतीय शास्त्रावर भारतात संशोधन करता येणार नाही, असा आहे. पाश्चात्य वैद्यक हेच येथे अधिकृत वैद्यक मानले जात आहे. आणि त्यांचे प्रयोग करण्याचे तंत्र आज तरी भारतीय वैद्यकाला परवडणारे नाही. येथील प्रयोग हे शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेता आले नाही तर त्यावर जादू टोणा असा आरोप करता येवू शकतो. बहुराष्ट*ीय औषध कंपन्या या कायद्याचा उपयोग भारतीय शास्त्रावरील प्रयोग बंद पाडण्यासाठी करण्याची शक्यता आहे. या विधेयकाचा हा परिणाम हे कदाचित त्याच्या पुरस्कर्त्यांना अपेक्षित असेल किवा त्यांचा हेतू प्रामाणिक असेल असेही मानू पण काहीही झाले तरी आज भारतीय शास्त्रांचा ओघ विदेशात जाणे सुरु झाले आहे त्यावर होणे सहाजिक आहे.
    जादू टोणा यामुळे जे गुन्हे घडतात ते निस्तरण्याचे सामर्थ्य विद्यमान गुन्हा अन्वेषण संहितेत आहे असाच तज्ञांचा सल्ला आहे पण हा मुद्दा समजून घेण्याच्या मनस्थितीत अंधश्रद्धानिर्मुलन वाले नाहीत. तरीही लोकप्रतिनिधींना आपली बाजू समजावून देणे आवश्यक आहे. एक हजार वर्षांच्या पारतंत्र्यानंतर पुन्हा भारतीय शास्त्रांना नव्याने जाग यायला लागली आहे, अशावेळी त्याच्या पाठीशी लोकप्रतिनिधी उभे राहतील यासाठी टोकाचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.
– मोरेश्वर जोशी, पुणे
मोबाईल- ९८८१७१७८५५