
मुंबई, दि.२०नोव्हेंबर-वर्ष २००९ मध्ये भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २०० टन सोन्याची खरेदी केली होती. तेव्हापासून सोन्याच्या दरात वेगाने वाढ झाल्याने या गुंतवणुकीवर भारत सरकारला तब्बल ३० हजार कोटी रु. चा फायदा झाला आहे. सरकारकडील एकूण सोन्याच्या साठ्याचा विचार केला तर दोन वर्षाच्या काळात सरकारकडील सोन्याची किमत १ लाख कोटी रु. नी वाढली आहे.
नोव्हेंबर २००९ मध्ये भारत सरकारने आयएमएफकडून २०० टन सोन्याची खरेदी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. सध्या सोन्याचे तोळ्याचे दर २९ हजार रु. च्या आसपास आहेत. आयएमएफकडून भारत सरकारने सोने खरेदी केले, तेव्हा हे दर १५ हजार रु. च्या आसपास होते. विदेशी राखीव चलनाच्या तुलनेत सरकारला सोने जवळ बाळगावे लागते. सध्या भारत सरकारकडे ५५७.७ टन इतके सोने आहे. आयएमएफकडून सोने खरेदी करण्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर २००९ पूर्वी सरकारकडील सोन्याची किमत ५० हजार ७१८ कोटी रु. इतकी होती. आयएमएफकडून करण्यात आलेल्या खरेदीनंतर सरकारकडील सोन्याची किमत १ लाख ६० हजार कोटी रु. गेली आहे. आगामी काळातही सोन्याची किमत चढी राहण्याचा अंदाज असल्याने सोन्याच्या गुंतवणुकीवर सरकार मालामाल झाले आहे.
