
मुंबई,दि.१५ नोव्हेंबर- आर्थिक संकटात सापडलेल्या किगफिशर एअरलाईन्सला वाचविण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणत्याही स्वरुपाची मदत मागण्यात आलेली नाही, अशी माहिती किगफिशर एअरलाईन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केवळ तोट्यात वाढ होऊ नये, यासाठी परवडत नसलेल्या मार्गावरील विमानसेवा बंद करण्यात आल्याची माहितीही मल्ल्या यांनी दिली. किगफिशर एअरलाईन्सच्या तोट्यात दिवसेंदिवस भर पडत चालली आहे.
किगफिशर एअरलाईन्सला सप्टेंबर तिमाहीत ४६८.६६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. क्रूड तेलाचे दर वाढल्यामुळे तोट्यात भर पडत असल्याचे मल्ल्या यांनी स्पष्ट केले. गतवर्षीच्या दुसर्या तिमाहीत कंपनीला २३०.८१ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. कंपनीचे उत्पन्न मात्र १० टक्क्यांनी वाढून १३८३ कोटींच्या तुलनेत १५२८ कोटी रु. इतके झाले आहे.
