भावी पिढीची दैन्यावस्था

आज पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त देशात बाल दिन साजरा केला जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा प्रघात आह. पंडितजींना लहान मुले आवडत असत म्हणून हा दिवस असा साजरा केला जातो पण प्रत्यक्षात या दिवशी नेहरुंचीही आठवण काढली जात नाही आणि लहान मुलांच्या अवस्थेविषयीही काही विचार केला जात नाही. आता पंडित नेहरू यांचे  नेमके महत्त्व लोकांना माहीतच नाही त्यामुळे त्यांच्या विचारांचे स्मरण हा प्रकार शिल्लक नाहीच पण बालकांच्या दुरवस्थेविषयी विचार आणि काही कृती करण्यास मात्र भरपूर वाव आहे. आपल्या देशातले राज्यकर्ते इतके स्वार्थी झाले आहेत की, ते केवळ मतपेढ्यांचाच विचार करायला लागलेआहेत. ते सतत मतदानाचा आणि निवडून येण्याचा एकमेव विचार डोळ्यासमोर ठेवूनच सरकारी धोरणे आखायला लागले आहेत. लहान मुले ही काही वोट बँक नाही त्यामुळे सरकारचे लहान मुलांच्या बाबतीत काही धोरण ठरलेले नाही. खरे तर आजची लहान मलेच मोठी होऊन देशाचे भाग्य घडवत असतात पण आपल्या सरकारचे या पुढच्या पिढीबाबतचे निश्चित धोरण काय असा प्रश्न विचारला तर एकही मंत्री नक्की उत्तर देऊ शकणार नाही. नुसतीच डोकी खाजवायला लागतील किवा हायकमांडला विचारून सांगतो म्हणून निसटून जातील. गेल्या महिनाभरापासून दूरचित्रवाणीवर एक बातमी सातत्याने दाखवली जात आहे ती आह कोलकत्त्याची. तिथे सरकारी दवाखान्यात दररोज काही मुले मृत्यूमुखी पडत आहेत. 

या मृतांची संख्या दररोज १० किवा १२ अशीच असत. त्या दवाखान्यातली दृश्ये पाहिली तर अंगावर शहारा येतो. एकेका खाटेवर दोन दोन बाळंतिणी झोपलेल्या असतात.  त्यांची मुले जमिनीवर झोपलेली असतात. दाटी तर इतकी की फिरायलाही जागा नाही. डासांचा प्रादुर्भाव झालेला आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले. अशा वातावरणात आपल्या देशाची भावी पिढी तिथ आपले काही पहिले दिवस कंठत असते. त्यांच्या जन्माचा हा असा सोहळा असेल तर त्यांची वाढ कशी होत असेल ? आपल्या देशाला उद्या चालून आधार देणारे हे आधारवड आहेत पण त्यांच्या पायात आणि अंगात ताकद यावी याची कसलीही योजना सरकारकडे तयार नाही. त्यामुळे या देशात असे करोडो लोक आहेत की ज्यांची मुले पाचवा वाढदिवस साजरा करतीलच याची ग्वाही देता येत नाही. पाच वर्षांच्या आतल्या मुलांच्या कुपोषणामुळे होणार्‍या मृत्यूबाबत आपला देशा जगात पहिला आह. आफ्रिका खंडातल्या गरीब देशांनी, श्रीलंकेने आणि पाकिस्तानने हा प्रश्न प्रभावीपणे सोडवला आहे पण महाशक्ती होण्याची स्वप्ने पाहणार्‍या या श्रीमंत देशाला हा प्रश्न सोडवता येत नाही. आपण कोणत्या तोंडाने बाल दिन साजरा करीत आहोत आणि का साजरा करीत आहोत याचा काही पत्ता लागत नाही. आपले पंतप्रधान यूरोप खंडातल्या बँकांची समस्या सोडवण्यासाठी पुढे सरसावत आहेत पण त्यांना आपल्या देशातला हा साधा प्रश्न सोडवायला वेळ नाही. विमान कंपन्यांचे तोटे भरून काढायला या सरकारकडे भरपूर पैसा आहे पण लहान मुलांसह त्यांच्या आयांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना वट्ट राष्ट*ीय उत्पन्नाच्या एक टक्का खर्च करायचेही जीवावर येत आहे.

या लहान मुलांत अनेक मुले हागवणी सारखे विकार होऊन मरण पावतात. त्याशिवाय या कोवळ्या पानगळीची कारणे तपासली असता ती कारणे अतीशय किरकोळ आणि आपल्या आवाक्यातली असल्याचे दिसून येते. पण सहज निवारण करण्यासारख्या या कारणांकडे कोणाचे लक्ष नाही. मुलांच्या दुरवस्थेला केवळ उपेक्षा हेच सर्वात मोठे कारण आहे. स्वार्थाच्या पल्याड जाऊन देशाचा पुढच्या ५० वर्षांचा विचार करण्याची बुद्धीच या लोकांत शिल्लक राहिलेली नाही. या सरकारने २०५० साल डोळ्यसमोर ठेवून धोरणे आखायला हवीत पण त्यांची लघुनजर २०१४ च्या पुढे जात नाही. या सरकारची सारी शक्ती केवळ ४० वर्षांच्या एकाच बालकाचे कल्याण करण्याच्या विचारात खर्ची पडत आहे. आज या देशात अठरा वर्षाच्या आत वय असलेली ४० कोटी मुले आहेत. ही मुले या देशाची अशी काही जबरदस्त संपत्ती आहे की  जगातल्या कोणत्याही देशाने भारताचा हेवा करावा.  पण या अनमोल देणगीची आपण काय कदर करीत आहोत ? ही पिढी सशक्त करणे तर दूरच पण तिच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांचीही पूर्ती करण्याची कसली योजना या सरकारकडे नाही. परिणामी ज्या भावी पिढीच्या हातात अभ्यासाची पाटी असायला हवी त्या पिढीच्या डोक्यावर लोखंडी पाटी देण्यात आली आहे. ४० कोटी मुलांतली चार कोटी मुले बालकामगार आहेत. बाल दिन साजरा होत आहे ही आनंदाची बाब आहे पण सरकार चालवणार्‍या कोणाला तरी आपल्या बालकांची  दुःस्थिती पाहून त्यांची दया येते का ? सरकारी पैसा ही पुढची पिढी तयार करण्यासाठी खर्च केला पाहिजे तरच देशाचे भवितव्य चांगले आहे. सरकारला याची जाणीव होईल का ?