सॅनिटायझरच्या किमतीत होणार वाढ; लागणार १८ टक्के जीएसटी


नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक स्वच्छतेला प्राधान्य देत आहे. त्याचबरोबर कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. साबण किंवा सॅनिटायझरने हात धुतल्यास कोरोनापासून बचाव होतो, असे तज्ज्ञ सांगतात. पण आता तेच सॅनिटायझर महागणार आहे. कारण १८ टक्के जीएसटी अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरवर लागणार असल्याचे ऑथॉरटी ऑफ ऍडव्हान्स रुलिंगने (एएआर) म्हटले आहे.

याप्रकरणी गोव्यातील स्प्रिंगफिल्ड इंडिया डिस्टिलरीज कंपनीने एक याचिका दाखल केली होती. एएआरने त्यावर निर्णय देताना अल्कोहोल असलेले सॅनिटायझर जीएसटीच्या १८ टक्क्यांच्या टप्प्यात येत असल्याचे म्हटले. सॅनिटायझरच्या वर्गीकरणात स्पष्टता यावी यासाठी एएआरच्या गोव्यातील पीठाकडे स्प्रिंगफिल्ड इंडिया डिस्टिलरीजने याचिका दाखल केली होती. आम्ही कंपनीकडून उत्पादन आणि पुरवठा करत असलेल्या सॅनिटायझरला जीएसटीमधून सूट मिळाली आहे का, अशी विचारणा केली होती. त्यावर अल्कोहोलचा समावेश असलेल्या सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी लागणार असल्याचे एएआरने सांगितले.

अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरच्या श्रेणीत याचिकाकर्त्यांकडून उत्पादित सॅनिटायझर अल्कोहोलचा समावेश होतो. एचएसएन ३८०८ शीर्षकाखाली त्याचे वर्गीकरण होते. त्यामुळे १८ टक्के जीएसटी त्यावर लागेल. ग्राहकांशी संबंधित असलेल्या मंत्रालयाने हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत केला आहे. पण जीएसटीतून सूट देण्यात आलेल्या उत्पादनांची यादी वेगळी असल्याचे एएआरने स्पष्ट केले.

Leave a Comment