येत्या नोव्हेंबरमध्ये अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

पुणे, दि.२७ (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात प्रथमच अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन घेण्यासाठी संत साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, राज्यातील विविध पीठे व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक एकत्र आले आहेत. त्याचबरोबर महानुभाव व रामदासी पंथांमधील ज्येष्ठ महाराज यांच्यामध्ये देखील याविषयी चर्चा सुरु झाली असून  नोव्हेंबर मध्ये  संमेलन होणार आहे.याबाबतची प्राथमिक बैठक आळंदी येथे पार पडली. येत्या नोव्हेंबर महिन्यात नाशिक, परभणी अथवा बीड या शहरांपैकी एका ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी वारकरी संत साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.  परिषदेचे शिष्टमंडळ वरिल ठिकाणी भेट  देऊन लवकरच स्थळ जाहिर करणार आहे.
 महाराष्ट्रातमध्ये आजपर्यंत अनेक संतानी समाजाला विचारांची दिशा दिली. त्यांनी दिलेली ही दिशा व शिकवण एकविसाव्या शतकातील मानवी जीवनास उपयुक्त ठरावी यासाठी किर्तन व वारी यापलीकडे जाऊन भव्य स्वरुपात संतांचे प्रगल्भ विचार समाजापर्यंत पोहचविण्यासाठी अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. सांगलीचे विठ्ठल पाटील (काकाजी) यांनी संत विचारांच्या प्रसारासाठी संमेलनाची भूमिका मांडली आहे.
या बैठकीस डॉ. सदानंद मोरे, तनपुरे महाराज, बंडातात्या कराडकर, तुकाराम काळे माऊली (आजरेकर), प्रकाश बोदले महाराज, लहवितकर महाराज, डॉ. यशवंत पाठक, डॉ. शिवाजी मोहिते, माणिक गुट्टे महाराज, निवृत्तीमहाराज हांडे, शिवाजी मोरे देहुकर, संजय देहुकर, बाळासाहेब देहुकर, रामशास्त्री व रामभाऊ चोपदार आणि रामदास जाधव महाराज उपस्थित होते. महाराष्ट*ात प्रथमच होणार्‍या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमास या सर्व तज्ज्ञ मंडळींनी यावेळी एकमताने पाठिबा जाहीर केला.
या संमेलनामध्ये विविध सत्संग पीठे, कला, साहित्य, क्रीडा व राजकीय प्रतिनीधींना निमंत्रीत करुन त्यांच्यासमोर संत साहित्याची चळवळ आणि भविष्यातील दिशा याविषयी सखोल चर्चा केली जाणार आहे. संमेलनातील उपसमित्या व इतर चर्चा करण्यासाठी पंढरपूर येथे ८ ऑक्टोबर रोजी  बैठक आयोजित करण्यात आली आहे.