विलासराव थोडा विचार कराच

युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या निवडणुकीत डॉ. विश्वजित कदम यांनी जीत मिळवली.शेवटी ही निवडणूक युवकांची आहे पण ती मोठ्या नेत्यांच्या प्रभावाच्या छायेत होणार हे अगदी उघड आहे कारण या निवडणुकीत उतरलेले युवक नेते हे कोणा तरी बड्या नेत्यांचे थेट किवा अप्रत्यक्ष वारसच होते. म्हणजे या निवडणुकीत विश्वजित कदम यांचा झालेला विजय हा डॉ. पतंगराव कदम यांचा विजय आहे. बाळासाहेब थोरात यांचा पराभव आहे. नारायण राणे, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिदे या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी विरोध केला असतानाही डॉ. विश्वजीत कदम यांनी राज्याच्या राजकारणात, कदम कदम बढाये जा म्हणत उद्याच्या सर्वोच्य पदावरचा आपला पहिला प्राथमिक दावा सांगितला आहे. ते तीन माजी मुख्यमंत्री आता माजी असले तरी  कोणत्याही क्षणी आजी (म्हणजे विद्यमान) व्हायला आतुरलले आहेत. पण त्यांच्या विरोधात  आणखी एक माजी अशोकराव चव्हाण आणि आताचे मुख्यमंत्री त्यांचे आडनाव बंधू यांनी कदमांना मदत केली. या निमित्ताने मुख्यमंत्रीपदाचेच एक वेगळे राजकारण लढवले गले. या निमित्ताने अशोकराव चव्हाण यना विलासरावांचा बदला घेण्याचा अप्रत्यक्ष आनंदच मिळाला.
    विश्वजित कदम यांचा मुख्यमंत्रीपदाशी काही संबंध नाही कारण त्यांचे पिताजी डॉ. पतंगराव कदम हे आजीही नाहीत आणि माजीही मुख्यमंत्री नाहीत. मात्र ते संधी हुकलले मुख्यमंत्री आहेत. खरे तर त्यांनी आपल्या मोकळ्या स्वभावाने अशोकरावांच्या विरोधात काही उद्गार काढले होते आणि ते उद्गार ध्वनिमुद्रित करून सर्वांना ऐकवले गेले होते. उद्गारामागेही काही कारण होते. अशोकरावांनीच पतंगरावांना ‘वना’त पाठवण्याचा प्रयत्न केला होता. तो तसा करताना अशोकराव, आपण मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहोत या भ्रमात होते. मात्र त्यांनाच पुढे अशोकवनात जावे लागले. स्थिती बरीच बदलली आणि वनातल्या पतंगरावांशी त्यांनी आता या निमित्ताने सख्य साधले. त्यांनी पाठींबा दिलेले विश्वजीत हे विजयी झाले आहेत. आता त्यांना सध्याच्या वैराण प्रवासात ओअॅसिसच दिसल्यागत झाले असेल. एकंदरीत काँग्रेसमध्ये आता घराण्यांचाच संघर्ष होत आहे. पक्षात आणि पक्षाची सत्ता असलेल्या सरकारांत  वरपासन खालपर्यंत कोणत्या पदांवर कोणा कोणा नेत्यांची मुले, पुतणे, भाचे आणि मुली कार्यरत आहेत याची यादी काढली तर बहुतेक पदांवर आता घराणेशाही चांगलीच रूढ झाली असल्याचे दिसून येईल.
     लातूरकर (खरे तर बाभळगावकर) देशमुख घराण्याला या निवडणुकीत धक्का बसला आहे. कारण विलासरावांनी सत्यजित तांबे यांचा विजय प्रतिष्ठेचा केला होता. त्यांनी तो कितीही प्रतिष्ठेचा केला असला तरीही त्यांची प्रतिष्ठा रहायची की जायची हे आता अमितभैय्या यांच्या कार्यशैलीवर अवलंबून आहे. निदान या निवडणुकीत तरी तसे होते. कारण अमितभैय्या यांनीच पुढाकार घेऊन बेसुमार सदस्य नोंदणी केली होती. विलासरावांच्या इतर काही गोष्टी काहीही असल्या आणि कशाही असल्या तरी त्यांची कार्यशैली तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्याला साजेशी आणि लोकशाहीशी सुसंगत असते. पण भैय्याचे बघावे तर वेगळेच. त्यांची शैली पूर्णपणे कॉर्पोरेट शैली असते. तिच्यामुळे या निवडणुकीत अशोकराव पुरस्कृत विश्वजित पुढे विलासराव पुरस्कृत सत्यजितचे काही चालले नाही.  ‘सत्या’ची जीत व्हायला हवी कारण महात्मा गांधींनीच सत्याची नेहमी जीत होत असते असे म्हटले आहे. (सत्यमेव जयते).  गांधीजींच्या वचनाला अनुसरून विलासरावांनी ‘सत्या’च्या मागे आपले बळ उभे केले पण ते यशस्वी ठरले नाहीत. सत्याचा जय होतो पण त्याच्या मागे सत्याचा पाठींबा असेल तरच जय होत असतो. सत्याच्या मागे केवळ ‘सत्ते’चे बळ लावले म्हणून सत्याचा जय होत नसतो.
    सत्य आणि सत्ता यांचा लातुरात फार मोठा संघर्ष चाललेला आहे. खरे तर ही दोन अक्षरे समान असतात पण त्यांच्यात एक विसंवाद असतो.सत्तेपुढे सत्याचे काही चालत नाही. सत्तेपुढे सगळे झुकतात पण सत्याकडे कोणी ढुंकूनही पहात नाही. सत्ता हातात असते तोपर्यंत नेत्यांच्या  भोवती नेहमीच भाटांचा गराडा असतो आणि ते नेत्यांची स्तुती करीत असतात. ती  सत्य नसते. सत्य सांगायच्या भानगडीत कोणीच पडत नाही. त्यामुळे आता विलास रावांना अमित भैय्यांची कॉर्पोरेट शैली फार महागात पडणार आहे हे सत्य कोणीच सांगत नाही पण ती वस्तुस्थिती आहे. ती विलासरावांनाही लक्षात येत नाही.  शेवटी पुत्रप्रेम प्रभावी ठरणारच ना ! आधीच परखडपणा रुचत नाही त्यात मुलाविषयी काही परखड बोललेले खपत नाहीच. निदान असा एखादा धक्का बसल्यावर तरी डोळे उघडायला काय हरकत आहे ? आता तरी विचार करा. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट*ाच्या राजकारणात धक्के का बसायला लागले आहेत ? आठ वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहून कमावलेली पुण्याई आता का आटायला लागली आहे ? आता पुन्हा राज्यात  जम बसवायचा असेल तर महाराष्ट*ातच यावे लागेल असे का वाटायला लागले आहे ? विचार करा. आमचा सल्ला मानवत नसेल तर गोपीनाथरावांशी चर्चा करा.