आता चिदंबरम…..

२जी स्पेक्ट्रम प्रकरणातले प्रमुख आरोपी ए. राजा यांनी विशेष न्यायालयात आपली जबानी नदवताना या प्रकरणात आताचे गृहमंत्री आणि तेव्हाचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही ओढले होते. २००७ साली या स्पेक्ट्रमचे परवाने ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीची माहिती चिदंबरम यांना होती, त्यांच्या परवानगीनेच ही पद्धत निश्चित करण्यात आली होती असे राजा यांनी सांगितले होते. अशा रितीने  चुकीच्या पद्धतीने स्वस्तात परवाने घेणार्‍या कंपन्यांनी आपले  परवाने अन्य कंपन्याना बाजारभावाने विकून बक्कळ पैसा कमावला. त्यांना परवाने देताना ते विकण्यास बंदी घालण्यात आली होती  पण त्यांनी संबंधित नियमातून पळवाट काढली. आपण परवाने विकत नसून कंपनीच विकत आहोत असे सांगितले. नियमात, परवाने विकू नयेत असे म्हटले होते, कंपनी  विकू नये असे म्हटले नव्हते. त्यांनी नियमांतून काढलेली ही पळवाटही चिदंबरम यांना माहीत होती आणि तशी ती काढली तरी मोठा नियम भंग होत नाही असा निर्वाळा चिदंबरम यांनी दिला असे राजा यांनी सांगितले होते. म्हणजे चिदंबरम हे २ जी  स्पेक्ट्रम प्रकरणातले आरोपी होऊ शकतात असेच जणू राजा यांनी म्हटले होते. 

गेल्या काही दिवसांत २ जी प्रकरणात सर्वांचे लक्ष चिदंबरम यांच्याकडे लागले आहे. हे प्रकरण जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात नेणारे  जनता पार्टीचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनीही एक अर्ज सादर केला असून चिदंबरम यांची या संबंधात तपासणी केली जावी अशी मागणी केली आहे. न्यायालयाने या संबंधात सीबीआयकडे विचारणा केली. तेव्हा सीबीआयने चिदंबरम यांची तपासणी करण्याचे काम आपल्या कार्यकक्षेत येत नाही असे सांगून चिदंबरम यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत राजा यांनी चिदंबरम यांना आत ओढण्याचा प्रयत्न केला पण सीबीआयने त्यांच्यावर २ जी स्पेक्ट्रम प्रकरणाचा एकही शिंतोडा उडू नये अशी तजवीज केली. सध्या माहितीच्या अधिकाराचा  कायदा लोकांच्या हातात आला आहे आणि  सरकारमधली कोणतीही माहिती आता लपून राहणार नाही. त्यामळे चिदंबरम हे रत्न फार दिवस लपून राहणे शक्यच नव्हते. माहितीच्या अधिकारामुळे या संबंधातली काही  महत्त्वाची माहिती उघड होत आहे.  ही माहिती इतकी मोक्याची आहे की, चिदंबरम यांना फार दिवस या भानगडीपासून दूर राहता येणार नाही. २००३ साली झालेल्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत, स्पेक्ट्रमच्या किमती ठरवण्याचा अंतिम अधिकारी अर्थमंत्र्यांना असावा असा ठराव करण्यात आला होता. त्यामुळे २ जी मध्ये देशाची लूट झाली याची अंतिम जबाबदारी अर्थमंत्र्यांचीच आहे. आता चिदंबरम या प्रकरणाबाबत हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत पण,  परवाने मंजूर होण्याच्या काळात त्यांनी आपली ही जबाबदारी पूर्णपणे स्वीकारून पारही पाडली होती. ती आता त्यांना त्रासदायक ठरत आहे.

स्पेक्ट्रम घोटाळा झाल्यानंतर राजा आणि चिदंबरम यांची भेट झाली. ही भेट झालीच नाही असे आधी सरकारतफर्े सांगण्यात आले पण नंतर बैठक झाल्याचे पुरावे समोर आल्यावर ती झाली असल्याचे जाहीर केले. या बैठकीत काय झाले याची माहिती मागितली असता, बैठकीचा वृत्तांत लिहिला नव्हता असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या बैठकीचा वृत्तांत लिहिलेला होता. तो माहितीच्या अधिकाराखाली मागण्यात आला तेव्हा देण्यात आला. या बैठकीत चिदंबरम यांनी स्पेक्ट्रमच्या वाटप पद्धतीचे समर्थन केले होते आणि आता या गोष्टीचा फेरविचार करण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. याचाच अर्थ असा की, चिदंबरम यांनी राजा यांच्या भ्रष्टाचाराला दुजोरा दिला होता. या बैठकीचा वृत्तांत अर्थ सचिवांनी लिहिलेला असून तो अधिकृत आहे. या प्रकाराने चिदंबरम अडचणीत आले आहेत. त्यांना अडचणीत आणणारांना आताचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पूर्णपणे सहकार्य केले आहे. कारण चिदंबरम जे काही बोलले त्याचा  वृत्तांत अर्थ खात्यातच उपलब्ध आहे. म्हणजे चिदंबरम उघडे पडावेत अशी प्रणव मुखर्जी यांचीच योजना आहे. मुखर्जी आपल्या खात्यातली कागदपत्रे फोडून आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती चिदंबरम यांना वाटत होतीच. म्हणूनच चिदंबरम यांच्या  आशिर्वादाने कोणीतरी अर्थखात्याच्या कार्यालयात काही टेबलांना च्युइंगगम चिकटवला होता असा संशय घेतला जात आहे.  हे प्रकरण घडण्याच्या आधी काही दिवस  मुखर्जी यांनी एक पत्र पंतप्रधानांना पाठवले आहे. या पत्रात, ‘२ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात झालेले देशाचे नुकसान अर्थमंत्री टाळू शकले असते’ असे म्हटले आहे. म्हणजेच तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी (अर्थात पी. चिदंबरम यांनी) आपल्या  कर्तव्यात कसूर केली असे मुखर्जी यांनी सूचित केले आहे.  हे पत्र मुखर्जी यांच्या कार्यालयाने गेल्या मार्चमध्येच पंतप्रधानांना पाठवले आहे. ते आता न्यायालयात उघड झाले आहे. एकंदरीत २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात पी. चिदंबरम यांना घेरण्याची तयारी पुरी झाली आहे. आता येत्या एक दोन दिवसातच त्यांच्या या प्रकरणातल्या सहभागाबाबत  सर्वोच्य न्यायालयात एक सुनावणी होणार आहे. काँग्रेस मध्ये आगामी पंतप्रधानपदासाठी सुरू असलेल्या साठमारीचाही एक संदर्भ या घडामोडींना आहे.