मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसह रस्तेमार्गे पंढरपूरकडे रवाना


मुंबई : सहकुटुंब राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील आहेत. आषाढी एकादशी निमित्त त्यांच्या हस्ते महापूजा केली जाईल. विठूमाऊलीच्या पुजेसाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचा विशेष मान असतो. उद्धव ठाकरे त्यासाठीच सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. दुसरीकडे पंढरपूरच्या दिशेने राज्यातील मानाच्या पालख्या देखील मार्गस्थ आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत या महापुजेत या पालख्यांचे प्रतिनिधी देखील सहभागी होतील.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी महापूजेसाठी येणार असल्याने प्रशासनाकडून मोठी दक्षता घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत मंदिरात केवळ 9 मानाच्या पालख्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. एकूणच राज्यभरातील कोरोनाचे संकट आता थेट विठ्ठलाच्या दारात येऊन ठेपले आहे. विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची महापुजा इतिहासात पहिल्यांदाच अनेक निर्बंधांसह अशा पद्धतीने होत आहे.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका वाखरीत आल्यानंतर त्यांना पंढरपूरात घेऊन येण्यासाठी संत नामदेव महाराज यांच्या पादुका पंढरपूरातून वाखरीत जातात. पण, संत नामदेव पादुका यंदा कोरोनामुळे विठाई एसटीतून जाणार आहेत. त्यामुळे पंढरपूर आगाराने ही विठाई बस आकर्षकपणे सजवली आहे. परंतू ही बस चालवण्याचा मान मुस्लीम समाजातील अरिफ शेख यांना मिळाला आहे. ही निवड चिठ्ठीच्या माध्यमातून झाली आहे.

दरम्यान, दिवे घाटाचा टप्पा पार करत सासवडच्या दिशेने ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका असलेली बस मार्गस्थ झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका देखील पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. या बसमध्ये अखंड अभंगवाणी सुरु असून टाळ मृदूंग वाजवत अभंगवाणी सुरु आहे. ज्ञानोबा-तुकोबा असा जपनाम करत पादुका घेऊन जाणारी ही बस पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. कोरोनाच्या सावटामुळे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शासनाने दिलेल्या ‘विठाई’ या एसटी बसने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला. मुख्य मंदिरात भजन झाल्यानंतर वारकरी संत तुकोबांच्या पादुका घेऊन मंदिर प्रदक्षिणा घालून पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

Leave a Comment