अण्णांच्या पाठिब्याचे लोण ग्रामीण भागापर्यंत, शासनाच्या असंवेदनशीलतेबद्दल तीव्र संताप

अक्कलकोट दि.२२ ऑगस्ट-ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या सशक्त जनलोकपाल विधेयकासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणास अक्कलकोट शहरातील नागरिकांनी पाठिबा दर्शवला आहे.यामुळे पाठिब्याचे लोण आता तालुक्यातील ग्रामीण भागातही पोहोचले आहे.अक्कलकोट शहर यानंतर तालुक्यातील ग्रामीण भागातील कडबगाव स्टेशन पंचक्रोशीतील मैंदर्गी, हंजगी आदी भागांतून अण्णांच्या समर्थनार्थ विविध पाठिब्याची आंदोलने होत आहेत. केंद्र सरकार मात्र असंवेदनशील बनले असल्याने सर्वच स्तरांतून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
देशात भ्रष्टाचाराच्या राक्षसाने मोठ्याप्रमाणावर  थैमान घातले आहे.गल्लीपासून  दिल्लीपर्यंतच्या सर्व स्तरावर सामान्य माणसाला कुठलेही काम करण्यास पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत. सामान्य माणूस या भ्रष्टाचारामुळे होरपळून निघत आहे. भ्रष्टाचारास पायबंद घालण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व सिव्हिल सोसायटी टीमने सशक्त जनलोकपाल विधेयकाची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. यामध्ये कुणीही भ्रष्टाचारासंदर्भात पंतप्रधान, खासदार, न्यायमूर्ती, मंत्री, सर्व शासकीय कर्मचारी, सर्व लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल तक्रार केल्यास जनलोकपालास चौकशीचे अधिकार असतील. सदर तक्रारीत दोषी आढळल्यास कठोर शासन, दोन वर्षात याबाबत निर्णय होईल. अशा सशक्त लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शांतीच्या मार्गाने आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा सोमवारी सातवा दिवस सुरू झाला. केंद्र सरकार मात्र असंवेदनशील असल्यासारखे वागत आहे. याबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने संसद सर्वोच्च आहे, असे अकलेचे तारे  तोडले आहेत, पण सरकार वा संसद सर्वोच्च नसून, जनता सर्वोच्च आहे. लाखो लोकांचा जनलोकपालसाठी पाठिबा मिळत आहे.या आंदोलनास जगभरातून पाठिबा मिळत आहे.
अक्कलकोट शहरातील धरणे आंदोलन, मेणबत्ती मोर्चा, मूकमोर्चाचे लोण आता ग्रामीण भागात पसरत आहे. कडबगाव स्टेशन, अक्कलकोट स्टेशन येथे अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिले लाक्षणिक उपोषण झाले. भ्रष्टाचार विरोधी जनांदोलन अक्कलकोट तालुका शाखा व गणेश ग्रुप सामाजिक प्रतिष्ठान संयुक्तपणे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले होते. यामध्ये जेऊरवाडी, कडबगाव, मराठवाडी, गौडगाव, आबावाडीसह या पंचक्रोशीतील सुमारे ५० ते ६० ग्रामस्थांनी व १० महिलांनी सहभाग नोंदवला. मैंदर्गी शहरात रॅली हंजगी कँडल मार्च झाला. अशाप्रकारे अण्णा हजारे यांच्या पाठिब्याचे लोण आता वाढतच चालले आहे.
 यामुळे या जनमताचा केंद्र शासनाने आदर करावा.अण्णा हजारे यांनी सशक्त जनलोकपाल विधेयक मागणीसाठी आरंभलेल्या उपोषणास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी पाठिबा व्यक्त करून लाक्षणिक उपोषणात सहभाग नोंदवला.
शासनाच्या संवेदना नष्ट : जनतेतून तीव्र प्रतिक्रिया
अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा कालावधी वाढत आहे. तसे केंद्र शासनाच्या निष्क्रीयतेवर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकार असंवेदनशील बनले आहे. .जनलोकपाल विधेयकासाठी देशभरातून  मिळणारा पाठिबा केंद्र सरकारला दिसत नाही. लोकप्रतिनिधी निवडून गेल्यावर जनमताचा आदर करीत नाहीत. जनतेचा विश्वास गमावल्यास लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार मिळावा, अशा प्रतिक्रिया या आंदोलनाच्या निमित्ताने व्यक्त होताना दिसत आहेत. शांततेने होणारे जनलोकपाल विधेयकासाठी होणार्‍या आंदोलनाची दखल न घेतल्यास याचे विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या असंतोषाची खदखद तीव्र स्वरूपात वाढत आहे. शासनाने यावर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे, अशी मागणी अक्कलकोट तालुकावासीयांतून व्यक्त केली जात आहे.