महाजनांनी ‘चंपा’चे बारसे घातले तर भाजपमधीलच काही लोक फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे


धुळे : स्वत:चे नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची भारतीय जनता पक्षात परंपरा आहे. त्यातच पक्षातील लोक नरेंद्र मोदींना ‘नमो’, अमित शहांना ‘मोटाभाई’ म्हणतात, त्याप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा म्हणत असतील, अशी पुन्हा एकदा टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी भाजपवर केली आहे. ‘चंपा’ असा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख केला जातो, याचे तीव्र दु:ख होत असल्याचे गोटे यांनी म्हटले आहे. पण चंद्रकांत पाटलांना हे माहित नसावे की, स्वत: गिरीष महाजनांनी त्यांचे ‘चंपा’ नावाचे बारसे केले. महाजनांच्या कार्यालयात बसलो असताना, अरे त्या ‘चंपा’ ला फोन लाव असे म्हटल्याचे गोटेंनी सांगितले आहे.

यासंदर्भात अनिल गोटे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात ते म्हणतात, भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. पक्षातील आपापसातील द्वेष आणि स्पर्धा एवढी टोकाला गेली होती की, त्यांनीच गुपचूप एकमेकांचे नामकरण करुन बारसे साजरे केले. भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते देवेंद्र फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे! आता तेच नामकरण सर्वश्रुत झाले, त्याला विरोधी पक्ष तरी काय करणार? असे अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

27 जूनला पुन्हा एक पत्रक अनिल गोटे यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे. अनिल गोटे यांनी या पत्रकात म्हटले आहे की, पडळकरांच्या नथीतुन मराठा समाजावर तीर मारुन धनगरांना राज्यातील भाजप नेते उसकावीत आहेत. अर्थात आपल्या वक्तव्याच स्पष्टीकरण देतांना पडळकरांनी भावनेच्या भरात मी बोलून गेलो, असे म्हटले. भावनेच्या भरात बोलले असे खरे मानले तरी सुध्दा पोटात होत तेच ओठावर आले, असा अर्थ होतो.

दरम्यान प्रसार माध्यमांसमोर बोलतांना भाजपचे प्रवक्ते राम कदम, अनिल गोटे यांचे वय झाले, असे म्हणाले. त्यांना माझ्या वयाची नेमकी काय अडचण निर्माण झाली हे मला समजले नाही. वयाचा आणि वक्तव्याचा नेमका संबंध आला कुठे? पक्षातील विरोधकांकडून नाथाभाऊंच्या प्रकृती बद्दल अशीच वक्तव्ये केली जात होती. राम कदमांना ऐवढेच सांगतो की, समुद्र किनारी जावून तोकड्या चड्ड्यांमध्ये फोटो सेशन केले. राहुल महाजनच्या समवेत महिलेशी केलेल्या वर्तनावर वयाचे मुल्यमापन करायचे का? माझ्याबद्दल जेवढे वैयक्तिक बोलाल तेवढ्याच समजेल अशा भाषेत मी तुम्हाला उत्तर देईन ! माझ्या नादी लागू नका, असा थेट इशाराच गोटे यांनी दिला आहे.

गोटे म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीसांना महारोग म्हणालो नाही. संतापाच्या भरात वगैरे काही बोललो नाही. उलटपक्षी माझ्या मनात उसळलेल्या संतापाच्या ज्वालामुखीची आग बाहेर पडू नये म्हणून संयमी वक्तव्य केले. जे पत्रकात प्रसार माध्यमांशी बोललो तेच माझ्या पत्रकात आहे. शांत डोक्याने संतापावर नियंत्रण ठेवून लिहले आहे. फडणवीसांना महारोगाची उपमा दिली. ‘महारोगी’ असे म्हणालो नाही. याचे भान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठेवावे, असे अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment