‘चीनी सामानांवर बहिष्कार टाकून, भारताला विजय मिळवून देऊ’, कंगनाचे चाहत्यांना आवाहन

भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. सोशल मीडियावर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यातच आता प्रत्येक मुद्यावर आपले मत मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने देखील चीनी वस्तू बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. लडाखमध्ये घडलेल्या घटनेनंतर चीनविरोधात उभे राहणे आपले कर्तव्य असल्याचे तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

या व्हिडीओमध्ये कंगना म्हणाली की, जर कोणी आपल्या हाताची बोटे कापण्याचा प्रयत्न केला अथवा कोणी भूजांपासून हात कापण्याचा प्रयत्न केला तर किती त्रास होईल. हाच त्रास चीनने आपल्याला दिला आहे. सीमेवर एक-एक इंच वाचवताना आपले जवान शहीद झाले. त्यांच्या मातांचे अश्रू, विधवांच्या किंचाळ्या आणि त्यांच्या मुलांचे बलिदान तुम्ही विसरू शकाल ? सीमेवर जे युद्ध होते, ते केवळ सैन्याचे असते, सरकारचे असते, असा विचार करणे योग्य आहे ? यात आपले काहीही योगदान नाही ?

कंगना पुढे म्हणाली की, महात्मा गांधींनी सांगितलेले आपण विसरलो का, जर इंग्रजांना मोडून काढायचे असेल तर त्यांनी बनवलेल्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार करावा लागेल. या लढाईत भाग घेणे गरजेचे नाही का ? लडाख केवळ जमिनीचा एक तुकडा नाही, तो भारताच्या अस्मितेचा मोठा भाग आहे. भारताचा तळहात आहे. आपण शत्रूला त्याच्या नापाक हेतूंमध्ये यशस्वी होऊ देऊ शकत नाही.

कंगना म्हणाली की, चीनी उत्पादन आणि ज्या कंपन्यांमध्ये त्यांची भागीदारी आहे, त्यावर बहिष्कार करावा. ते जो पैसा भारतातून जमा करतात, त्याद्वारे शस्त्र घेऊन भारतीय सैन्यावर हल्ला करतात. आपण या युद्धात चीनची साथ देऊ शकतो ? तुम्हीच सांगा. आपल्या सैन्य आणि सरकारला पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य नाही का ? आपण शपथ घेऊ की आत्मनिर्भर बनू व चीनी सामानांवर बहिष्कार टाकू. या युद्धात भाग घेऊन भारताला विजय मिळवून देऊ. जय हिंद.

Leave a Comment