
आज राजकीय स्तरावर नेतृत्वाची एक मोठी पोकळी दिसत आहे.अण्णा हजारे यांनी उभे केलेले आव्हान पेलेल असा नेता सरकारमध्ये दिसत नाही.निवेदने, कारवाई आणि बळाचा प्रयोग या तिन्ही अंगांनी हे आंदोलन हाताळण्याची क्षमता असलेला एकही नेता आजच्या सरकारमध्ये नाही. स्वतःला मोठे धुरंधर समजणारे कपिल सिबल, चक्क पंतप्रधानपदाची आस बाळगणारे चिदंबरम,अचानकपणे महत्त्व आलेल्या अंबिका सोनी यांनी आता स्थितीची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत पण त्यांच्यात हे सारे हाताळण्याची क्षमता नाही. मुळात क्षमता नाही आणि सारी स्थिती सरकारच्या विरोधात गेलेली. हिसक आंदोलन हाताळणे सोपे असते. वातानुकूलित कक्षात बसून पोलिसांना फायरिंगची ऑर्डर देता येते पण अहिसक आंदोलन चिरडणे फार अवघड असते. तेवढा आवाका असलेला एकही नेता आज या सरकारमध्ये नाही. सारे भांबावलेले नेते परिस्थितीशरण होऊन जमेल ते निर्णय घेत आहेत आणि राबवत आहेत. संसद आणि सरकार हे सर्वोपरी आहे. आम्ही संसदेचे अधिकार अण्णांना देणार नाही अशी घोषणा करणार्या गृहमंत्री चिदंबरम यांना, आता अण्णा कोठे आहेत असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी, मला माहीत नाही असे उत्तर देऊन सर्वांवर बाँबगोळाच टाकला.
