.jpg)
मुंबई दि. १५ ऑगस्ट – लोकपाल विधेयकासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सोमवारी दिल्ली पोलिसांनी आंदोलन करु देण्याची परवानगी नाकारली. पोलिसांनी घातलेल्या अटी मानण्यास अण्णांनी नकार दिल्याने दिल्ली पोलिसांनी अण्णांना परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर अण्णा हजारे समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन होणारच असा निर्धार केला आहे.
मंगळवारपासून दिल्लीतील जयप्रकाश नारायण पार्कवर अण्णा हजारे उपोषणास बसणार होते. आंदोलनासाठी घातलेल्या अटी मान्य न केल्यामुळे आंदोलनाची परवानगी नाकारली जात असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. दिल्ली पोलिसांनी अण्णांच्या या आंदोलनासाठी फक्त तीन दिवसांची परवानगी दिली होती, सोबत २२ अटीही घातल्या हत्या. या अटीमध्ये केवळ ५० गाड्यांना पारवानगी, मंडप घालायचा नाही आणि क्षमता फक्त ५ हजार असावी, यांचा समावेश होता. अण्णा हजारे यांनी १६ अटी मान्य केल्या होत्या पण सर्वच्या सर्व अटी मान्य करण्यास त्यांनी नकार दिला होता.
अटी मान्य असल्याचे शपथपत्र देण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी केली होती. तीन दिवस उपोषण करावे असे कुठल्याही घटनेत लिहिलेले नाही. ही दडपशाही आहे, सरकार पुन्हा आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करीत आहे. आम्ही ही दडपशाही स्वीकारणार नाही, मंगळवारी उपोषण होईल. तुरूंगात जावे लागले तरी जाऊ , पण उपोषण करू असे आंदोलनाचे नेते अरविद केजरीवाल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जर या मैदानात राजकीय पक्षांसाठी दोन लाखांचे मेळावे होतात तर आमच्या आंदोलनासाठी माणसांचीच मर्यादा का?. जयप्रकाश नारायण पार्क परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून पोलिसांनी मैदानाला टाळे ठोकले आहे. मंगळवारी अण्णा या मैदानात प्रवेश करू शकणार नाही, अशा प्रकारे सर्व रस्ते अडवण्यात आले आहे. सरकारची ही तटबंदी पाहता आणि टीम अण्णांची निग्रह पाहता उपोषणादरम्यान मोठा संघर्ष होईल, हे स्पष्ट आहे.
