
काठमांडू, दि. १५ ऑगस्ट – मुख्य विरोधी पक्ष नेपाळी काँगस तसेच माओवाद्यांच्या दबावाखाली आलेले पंतप्रधान झालानाथ खनल यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. खनल यांच्या राजीनाम्यामुळे नेपाळमध्ये नव्याने राजकीय संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रपती राम बरन यादव यांनी खनल यांचा राजीनामा स्वीकारला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना पदावर राहण्यास सांगण्यात आले आहे.
नवीन पंतप्रधान निवडीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. खनल यांनी सीपीएन, युएमएलच्या केंद्रीय समितीसमोर पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. फेब्रुवारी महिन्यात १७ टप्प्यांत झालेल्या निवडणुकानंतर खनल यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतला होता. वर्ष २००६ मधील शांती प्रक्रिया कराराच्या अनुषंगाने ठोस काम झाले नाही तर आपण राजीनामा देऊ, असे त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस सांगितले होते. खनल यांचे सरकार देशातील कम्युनिस्ट पक्षाचे सर्वात कमी कार्यकाळ असलेले सरकार ठरले आहे. खनल हे केवळ सहा महिने सत्तेत राहिले. आपल्या विविध मागण्यांसाठी विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेस, सहयोगी माओवादी संघटना आणि तराईच्या मधेशी फ्रंटने खनल यांच्यावर दबाव आणला होता. याला वैतागून त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
