मुंबई दि. १४ ऑगस्ट – अमेरिका आणि युरोपमध्ये आलेले वित्तसंकट तसेच पुन्हा निर्माण झालेली जागतिक मंदीची शक्यता या पार्श्वभूमीवर गेल्या १२ दिवसांत विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारात ५८२९ कोटी रु. किमतीच्या समभागांची विक्री केली आहे. आगामी काळ बाजारात विक्रीचा मारा राहण्याचा अंदाज आहे. १ ते १२ ऑगस्ट या कालावधीत विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी २२ हजार ९५८ कोटी रु. किमतीच्या समभागांची निव्वळ खरेदी केली तर २८ हजार ७८७.७० कोटी रु. किमतीच्या समभागांची विक्री केली. याचा अर्थ त्यांनी ५८२९ कोटी रु. ची निव्वळ विक्री केली.
एस अँड पी रेटींग एजन्सीने अमेरिकेचे रेटिग कमी केल्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. युरोपमधील आर्थिक संकटातही वाढ झाली आहे. फ्रान्सचे रेटिग कमी कले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारासारख्या धोकादायक माध्यमातून निधी काढून घेतला जात आहे. सोने, चांदी अशा सुरक्षित माध्यमातील गुंतवणूक वाढल्याने सोन्या-चांदीचे दर आतापर्यंतच्या विक्रमी स्तरावर जाऊन पोहोचले आहेत.
