स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार; विखे पाटलांची टीका


मुंबई – भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात सत्ता स्थापन होऊन सहा महिने लोटले असून मागील काही दिवसांपूर्वी राज्यात सत्तेत सहभागी असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर लगेच पडद्या पडला. पण यावरून काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी लाचार झाले असून, बाळासाहेब थोरात यांना अध्यक्ष पद मी पक्ष सोडला म्हणून मिळाले. त्यांची स्वतःची कर्तबगारी काय?, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. सरकारमधील सहभागीदार असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी समोर आली होती. विखे पाटील यांनी या चर्चेवरून काँग्रेसच्या नेत्यांवर न्यूज १८ लोकमतशी बोलताना टीकास्त्र सोडले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात यांना अध्यक्षपद मी पक्ष सोडला म्हणून मिळाले. थोरातांची स्वतःची कर्तबगारी काय? थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस आहे. त्यांनी गेल्या सहा महिन्यात अशी कोणती कर्तबगारी दाखवली. बैठक राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी होत नाही, तर आपापसातील वाद मिटवण्यासाठी बैठका होत आहेत. काँग्रेसला एवढी लाचारी का करावी लागत आहे? काँग्रेसचे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी लाचार झाले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसची राज्यात वाताहत झाल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

विखे पाटील यांनी शिवसेनेविषयी भाष्य केले. राज्यावर कोरोनासारखे मोठे संकट ओढावलेले असताना राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. सरकारमधील तिन्ही पक्षात कोणताही निर्णय घेताना समन्वय नाही. आज राज्य सरकारच संभ्रमात आहे. आता शिवसेनेच्या हातात मातोश्रीचा रिमोट राहिलेला नाही. शिवसेनेचे सत्तेच्या वाटमारीत मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही मोठी फरफट होताना दिसत असल्यामुळे आता सत्तेत राहायचे की नाही याचा विचार शिवसेनेने करण्याची वेळ आल्याचेही विखे पाटील म्हणाले.

Leave a Comment