कोरोनाबाधितांसाठी ‘डेक्सामेथासोन’ नवसंजिवनी ठरत असल्याचा दावा


मुंबई : जगभरातील बहुतांश देशासाठी डोकेदुखी ठरलेल्या कोरोना व्हायरसचा समूळ नाश करणारे अद्याप सापडलेले नसतानाच आता ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन हे औषध प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर कोरोनाची लागण झालेल्या अति जोखमीच्या रुग्णांचे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे डेक्सामेथासोन या औषधाने जीव वाचल्याचा दावा देखील या शास्त्रज्ञांनी केला आहे. दरम्यान डेक्सामेथासोनवर जगभरात संशोधन सुरु असून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या परीक्षणातून असे समोर आले आहे की, व्हेंटिलेटरवर जे लोक होते त्यांच्यावर डेक्सामेथासोनचा वापर केला असता त्यांच्या मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांशाने कमी झाले आहे.

संशोधकांच्या मते, या औषधाचा वापर ब्रिटनमध्ये महामारीच्या सुरुवातीला केला असता तर जवळपास 5 हजार लोकांचा जीव वाचला असता. कोरोना रुग्णांवर या औषधाचा केलेल्या प्रयोगानंतर अतिजोखमीच्या रुग्णांवर डेक्सामेथासोन प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. व्हेंटिलेटरवरील तसेच ज्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे, अशा रुग्णांवर डेक्सामेथासोन प्रभावी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

कोरोना संसर्ग झालेले पण दवाखान्यात भर्ती न झालेले 20 पैकी 19 रुग्ण डेक्सामेथासोनमुळे बरे झाल्याचा दावा केला आहे. तर दवाखान्यात दाखल रुग्णही बरे झाले आहेत, पण त्यांना ऑक्सिजनसह आणखी काही गोष्टींची गरज पडली. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका टीमने केलेल्या संशोधनात दवाखान्यात दाखल 2 हजार रुग्णांना हे औषध दिले गेले. तर दवाखान्यात नसलेले पण कोरोना झालेल्या 4 हजार रुग्णांना हे औषध दिले गेले. जे रुग्ण व्हेंटिलेटरवर होते त्यांच्या मृत्यूचा धोका या औषधामुळे 40 टक्क्यांवरुन कमी होत 28 टक्क्यांवर आला आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती, त्यांच्या मृत्यूचा धोका हा 25 वरुन 20 टक्क्यांवर आला, असा दावा केला आहे.

दरम्यान औषधावर प्रतिक्रिया देताना ब्रिटन पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी म्हटले आहे की, या संशोधनामुळे नक्कीच आनंद व्यक्त केला जाऊ शकतो. या औषधाच्या पुरवठ्यासंदर्भात आम्ही योग्य पावले उचलली आहेत. संशोधक प्रोफेसर पीटर होर्बी यांनी दावा केला आहे की, आतापर्यंत हेच औषध आहे, ज्यामुळे मृत्युदर कमी झाला आहे. दवाखान्यात भर्ती रुग्णांवर या औषधाचा उपयोग करावा असे, प्रोफेसर लँडरी यांनी म्हटले आहे, तर डेक्सामेथासोनचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने गंभीर आजारी लोकांवरच करावा, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. हे औषध योग्य प्रकारे न घेतल्यास धोका संभवू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. डेक्सामेथासोन हे औषध स्वस्त असल्यामुळे याचा लाभ जगभरातील गरीब देशांना देखील होणार आहे.

Leave a Comment