आयटी कंपन्यांची व्यावयायिक उलाढाल ८४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली

मुंबई – माहिती-तंत्रज्ञानात गेल्या पाच वर्षांत भारताने मोठी भरारी घेतली आहे. झपाट्याने विकसित होणार्‍या आयटी क्षेत्रातील कंपन्यांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राने लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. गेल्या चार वर्षात पहिल्यांदाच या क्षेत्राने २५ टक्क्यांचा विकासदर गाठला आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात देशातील २०० आयटी कंपन्यांची व्यावयायिक उलाढाल ८४ अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. देशातील आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्या सॉफ्टवेअर निर्यातक असून त्यांच्या सॉफ्टवेअरला जगभरातून चांगली मागणी आहे.
नुकत्याच सायबर मिडिया या मासिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार आयटी क्षेत्रातील अव्वल २०० कंपन्यांची उलाढाल ३ लाख ८४ हजार २४० कोटी रुपयांवर गेली आहे. त्यातील २० बड्या कंपन्यांचा हिस्सा हा ५४ अब्ज डॉलर्स म्हणजेच २ लाख ४७ हजार ८०८ कोटी इतका आहे. २००९-१० च्या तुलनेत या कंपन्यांच्या उत्पन्नात २५ टक्क्याने वाढ झाली आहे. २००९-१० मध्ये या कंपन्यांचा विकास दर ८ टक्के होता. या सर्वेनुसार आयटी क्षेत्रातील टीसीएम, इन्फोसिस, विप्रो, एचपी व कॉग्निझेंट या अव्वल पाच कंपन्याच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्याने वाढ झाली आहे.