शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वात व्यापक – बाबासाहेब पुरंदरे

पुणे – गेल्या शंभर वर्षात शंभराहून अधिक चरित्रकारांनी शिवाजीमहाराजांवर चरित्र लेखनाचा प्रयत्न केला असला तरी शिवाजी महाराजांचे चरित्र येवढे व्यापक आहे की, अजून ते चरित्र लिहून पूर्ण झालेले नाही. पण अनेक इतिहासकार अभ्यासाला लागले आहेत त्यामुळे भविष्यात हे चरित्र निश्चत लिहून पूर्ण होईल, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज त्यांच्यावरील  ‘बेलभंडारख’ या डॉ सागर जावडेकर लिखित चरित्रग्रंथाच्या प्रकाशनसमारंभात बोलताना सांगितले. या चरित्रग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथराव माशेळकर यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमाला ज्येष्ठशास्त्रज्ञ डॉ विजय भटकर, डॉ शां.ब.मुजुमदार, रयतशिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे, दाजीकाका गाडगीळ अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.
श्री पुरंदरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, शिवचरित्र लेखनाचा आवाका असणारी फार थोडी मंडळी झाली.  थोर इतिहास शास्त्रज्ञ राजवाडे यांनी तर असे म्हटले होते की, मी आयुष्यभर काम करीत राहिलो तर अधिकाधिक म्हणजे शिवचरित्राची साधने गोळा करू शकेन.मी त्या चरित्रलेखनाच्या भव्य प्रासादाच्या उभारणीसाठी आवश्यक ते कागदपत्र गोळा करू शकेन.माझ्या मते राजवाडे यांच्यानंतर शिवचरित्र लिहीण्याची ऐपत शेजवलकर यांच्यात होती पण त्याना आयुष्यच कमी मिळाले. सध्या श्री गजानन भास्कर मेहेंदळे नावाचे एक गृहस्थ चरित्र लिहीत आहेत आणि त्यांच्यात मात्र ती क्षमता आहे. तरीही या चरित्राचा व्यापच मोठा आहे.
मला मात्र शिवचरित्र हे राष्ट्रउभारणीचे मोठे साधन वाटते म्हणून मी शिवचरित्र शाहिरीच्या स्वरुपात सांगितले आहे. ते काम करत राहण्यात आपल्याला धन्यता वाटते. सध्या जे शिवचरित्र उपलब्ध आहे तेही राष्ट्रउभारणीस प्रेरक आहे.
पुस्तक प्रकाशन करताना श्री माशेळकर म्हणाले, एकविसावे शतक सुरु होताना टाईम मासिकाने एक शतकाचा अंक काढला होता त्यात या शतकाचा मुख्य माणूस म्हणून ऑइन्स्टाईनचा उल्लेख केला होता. ऑईन स्टाईनने मात्र आपल्या ‘महात्माजींचा उल्लेख पृथ्वीतलावरील चमत्कार असा केला होता. त्याच प्रमाणे जर भारताबाबत बोलायचे झाले तर शिवाजी महाराज हे या जगात होउन गेले हे काही वर्षांनी असेच आश्चर्य वाटेल आणि त्यांचे चरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी साठ वर्षे हे चरित्र कथन करण्याचे काम केले यांचेही आश्चर्य वाटेल.श्री रावसाहेब शिदे म्हणाले, पन्नास वर्षापूर्वी मी  श्रीरामपूर येथे त्यांची शिवचरित्रकथन माला आयोजित केली होती. त्या सात दिवसाच्या कथाकथनाला यात्रेसारखे लोक येत व शिस्तीत येत हे मलाही आश्चर्य वाटे. पण त्यांनी केलेल्या पंधरा हजार भाषणाबाबतही हीच स्थिती आहे. या प्रसंगी डॉ विजय भटकर, डॉ शरश्चंदा्र गोखले, डॉ मुजुमदार, किरण ठाकूर यांचीही भाषणे झाली.

Leave a Comment