संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज्यांच्या पालख्यांनी पुणे दुमदुमले

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम यांच्या पालखीच्या रुपाने आज पुण्यात सारी तीर्थे अवतरली आहेत. दुपारी साडेतीन वाजता देहूच्या बाजूने संत तुकाराम महाराज यांची पालखी आली आणि येथील मरी आई गेट जवळ येउन थांबली आणि सव्वापाचच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीच्या बाजूने आली आणि युगानुयुगाची ही जिवाशिवाची ही भेट पालखीच्या रुपाने झाली. हा आनंदाचा सोहोळा बघण्यासाठी सारे पुणे लोटले होते. यावर्षी पुण्याचे महापौर संतोकसिग राजपाल हे सरदारची आहेत आणि पंजाबात सुरु झालेल्या संत नामदेवांच्या संत परंपरेचे पाईक आहेत. दोन्ही पालख्या एकत्र आल्यावर उपस्थित सर्वांनी ‘ज्ञानेश्वर माउली तुकाराम ’असा जयघोष केला.
    आज पहाटे पुण्याला जाग आली तीच मुळी ज्ञानोबा माउली तुकाराम या गजराने. कारण दोन्हीही पालख्यात एक लाखापेक्षा अधिक वारकरी असल्याने रस्त्यावर गर्दी फार आहे त्यामुळे अनेक  वारकरी मंडळींनी पहाटे ब्राह्ममुहूर्तावरच चालण्यास आरंभ केला. पहाटेपासूनच पुण्यात एक एक दिड्या येण्यास आरंभ झाला . भगवा ध्वज घेतलेले शे दीडशे वारकरी, पन्नासपेक्षा अधिक महिलांच्या डोक्यावर तुळशीवृंदावन,  चार पाच मृदंगधारी, वीसपंचवीस टाळकरी आणि मध्यभागी वीणाधारी अशा शेकडो दिड्या आज दिवसभर शहरात प्रवेश करीत होत्या. गेल्या वर्षीपर्यंत वारीकरी म्हणजे खेडूत असा समज असलेल्या दिड्या यावर्षीमात्र  शहरातील मंडळींच्या संख्येमुळे बदल जाणवून देत होत्या. दुपारी दोन वाजल्यापासून दिडीमार्गावरून फक्त दिड्याच येत होत्या येवढ्या प्रचंड संख्येने वारकरी यावर्षी सहभागी झाल्याचे लक्षात येत होते.
    दुपारी सव्वापाच वाजता मरीआई गेट म्हणजे शेतकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराशी भेट झालेल्या दिड्या पाच किमी अंतर कापून भवानीपेठेतील पालखीविठोबा आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात पोहोचेपर्यत रात्रीचे साडेअकरा वाजले. उद्या दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असेल वसोमवारी पालख्या पुढील मुक्कामाला रवाना होतील.