शिर्डी दि.२८ – साईच्या शिर्डीतील वाढती श्रीमंती तसेच भक्तांच्या संरक्षणासाठी अतिरिक्त व सक्षम पोलिस यंत्रणेची आवश्यकता निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांत शिर्डी पोलिसांची निष्क्रियता वारंवार सिद्ध झाल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.योग्य प्रशासन आणि कार्यक्षमतेसाठी शिर्डी शहर व शिर्डी ग्रामीण अशी पोलिस यंत्रणा उभारणे काळाची गरज झाली आहे.
शिर्डीतील सर्वसामान्यांची सुरक्षितता धोक्यात
तपास प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप थांबविल्याशिवाय गुन्हेगारी घटणार नाही, असे खुद्द पोलिस खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी खाजगीत सांगतात. साईबाबांच्या सबका मालिक एकचा संदेश आज जगभरात पोहोचला आहे. यामुळेच शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील कोट्यवधी लोक दरवर्षी शिर्डीत येत असतात. दिवसेंदिवस वाढत असलेली भाविकांची संख्या साईंच्या तिजोरीसह शिर्डीकरांच्या वैभवात भर टाकत आहे. या वाढणाऱ्या श्रीमंतीमुळे शिर्डीतील गुन्हेगारीसुध्दा झपाट्याने वाढली आहे.
