नवी दिल्ली दि.२६ – निवडणूका हाच देशातील भ्रष्टाचाराचा मोठा स्त्रोत बनू पाहात असल्याचे मत मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी यांनी व्यक्त केले आहे.निवडणूक काळात वाढणारे पेड न्यूजचे प्रमाण हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे सांगून कुरेशी यासंबंधी अधिक बोलताना म्हणाले की आत्तापर्यंत अशा ८६ केसेस आमच्या निदर्शनास आल्या असून त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाणार आहे.निवडणूक काळात भ्रष्टाचार वाढण्यास प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्ष यांचे आपसातील संबंध कारणीभूत ठरत असून ही काळजीची बाब आहे. पहिल्यांदा निवडणूक काळात दुसर्यां च्या नावाने प्रायोजक म्हणून जाहिराती देण्याचे प्रमाण अधिक होते आता मात्र राजकीय पक्ष आणि प्रसार माध्यमांनी ही रेषाही पार केली असून ते अधिक धीट झाले आहेत. आता राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामेच संपादकीय म्हणून छापले जात असून ही बाब निदनीय आहे.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका आता तोंडावर आहेत. प.बंगाल, आसाम, तमीळनाडू, पोन्डिचेरी आणि केरळ राज्यात होणार्याह विधानसभा निवडणूकांदरम्यान निवडणूक आयोग या बाबींवर बारीक लक्ष ठेवेल असे सांगतानाच ते म्हणाले की आजकाल राज्ये निवडणूक फंड देताना दिसत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले जात आहे. ही प्रथा थांबविण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करणार आहे. आगामी विधानसभा निवडणूकांत असे प्रकार आढळले तर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा आयोगाचा विचार आहे. तसेच प्रचार संपताना कोणती पैशांचा गैरवापर करत असल्याची बारीकशी तक्रार जरी आली तरी त्याची दखल आयोग ताबडतोब घेऊन योग्य पावले उचलेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
