WHOने मागे घेतील हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची ट्रायल बंद करण्याची शिफारस


नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मलेरिया रुग्णांवरील उपचारासाठी या औषधाचा वापर होतो. या दरम्यान हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सांगितले होते. अखेर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियाच्या औषधाच्या ट्रायल बंद करण्याची शिफारस मागे घेतली आहे.

याबाबत माहिती देताना डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसुस म्हणाले की, कोरोना मृत्युदरांचा बोर्डाने अभ्यास करुन आढावा घेतला आहे. या दरम्यान हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन चाचणी सुधारित करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आढळल्यामुळे आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर सुरु असलेल्या संशोधनात सहभागी संशोधकांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे.


दरम्यान संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी हा विज्ञानाचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. या ट्रायल थांबवण्यासाठी भारताने विरोध केला होता. जागतिक आरोग्य संघटनेकडून ही शिफारस मागे घेतल्यानंतर सीएसआयआरच्या डॉ. शेखर मांडे यांचेही माशेलकर यांनी कौतुक केले आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनने कोरोना बरा होतो की नाही हा संशोधनाचा विषय आहे. सुरवातीला काही अडचणी आल्या म्हणून संशोधन थांबवायला नको असे माशेलकर यांचे म्हणणं आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची क्लिनिकल चाचणी जागतिक आरोग्य संघटनेने तात्पुरती बंद केली होती. एका रिपोर्टच्या आधारे हा निर्णय घेतल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. या रिपोर्टमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांमुळे कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या रिपोर्टच्या आधारावर या गोळ्यांचा वापर बंद केल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले होते.

त्यानंतर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सांगितले होते. आयसीएमआरच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की, कोरोना व्हायरस नवीन आजार आहे. यावर ठराविक उपचार पद्धती नाही आणि यावर औषधही उपलब्ध नसून त्यावर संशोधन सुरु आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर एम्स आणि दिल्लीतील तीन खासगी रुग्णालयांमध्ये कन्ट्रोल्ड स्टडी केली गेली आहे. या स्टडीमध्ये हे औषध कोरोनावरही काम करु शकते आणि त्याचे फार दुष्परिणामही नाहीत. पण हे औषध देताना रुग्णाची ईसीजी तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Comment