ऊर्जाविषयक संशोधनातूनच देश स्वावलंबी होईल – प्रा. बागल

सोलापूर, २१ फेब्रुवारी  – भविष्यात सौर आणि पवन ऊर्जेचा वापर वाढणार असून ऊर्जाविषयक संशोधनातून देश स्वावलंबी होईल, असा विश्वास महाराष्ट्र  राज्य विद्युत मंडळाचे सेवानिवृत्त अभियंता आणि आयईआय सदस्य प्रा. सी. बी. बागल यांनी येथे व्यक्त केला. विद्या विकास प्रतिष्ठानच्या व्हीव्हीपी अभियांत्रिकी आणि आयईआय सोलापूर लोकल सेंटरतर्फे  आयोजित केलेल्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेच्या समारोप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. जी. के. देशमुख, परिषदेचे संयोजक प्रा. डी. बी. मंत्री, उपप्राचार्य एस. एन. कुलकर्णी, प्रा. शेखर जेऊरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पवन ऊर्जेतून भारतात ३ हजार ५९५ मेगॉवॅटची निर्मिती होत असून या दशकाच्या अखेरीस पवनऊर्जा हा ऊर्जेचा एकमेव पर्याय राहणार आहे, असे डॉ. आर. जी. ताटेड यांनी यावेळी बोलताना सांगितले. ऊर्जासंवर्धन, लेखापरिक्षण, व्यवस्थापन आणि कार्यक्षम वापर यावर अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील डॉ. डी. बी. तलंगे यांनी मार्गदर्शन केले. ‘सौरऊर्जा एक जागृती’ या विषयावरची पद्मश्री एस. पी. सुखात्मे यांची डॉक्युमेंटरी फिल्म सादर करून सौरऊर्जा या विषयावर डॉ. गोविद कुलकर्णी यांनी लघु व मध्यम उद्योगांबरोबर महिला बचत गटांना उपयोगी सोलार ड*ायरची माहिती दिली. सूक्ष्मजैव इंधन, पेशीतून ऊर्जानिर्मिती, रेफ्रिजरेशनसाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर यासंबंधी तज्ञांची भाषणे झाली. शेवटी प्रा. कात्रे यांनी आभार मानले.

Leave a Comment