जगप्रसिद्ध अजिंठा लेणी
महाराष्ट्रातील गुफांना ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासूनचा इतिहास आहे. सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या या गुफांपर्यंत पोहोचणे आजही दुर्गम वाटत असले तरी निरनिराळ्या धर्मांच्या भिक्षुंचे ते वसतीस्थान होते, हे विसरून चालणार नाही.अजिंठामधील रंगीत चित्रे, वेरूळमधील मूर्ती आणि एलिफंटा गुंफांमधील दैवी अवशेष पाहुन पर्यटक अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात. सुवर्णयुगाचा वारसा – अजंठा वेरुळच्या गुंफा अजिंठा-वेरुळच्या लेण्या म्हणजे महाराष्ट्राची गौरवस्थाने! पाषाणातून कोरून काढलेल्या या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. कित्येक शतकांपूर्वी भारतीय कारागिरांनी मिळविलेले कौशल्य आणि त्यांना लाभलेली सौन्दर्यदृष्टी त्यातून परावर्तीत होताना दिसते. या लेण्या एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस अगदी योगायोगाने, युध्शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना या गुहांचा शोध लागला. भारतीय कला आणि इतिहास याविषयी अधिकाधिक माहिती जाणण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी अजंठा हे आकर्षणकेंद्र बनले आहे.भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार अजंठा गुंफा संरक्षित केली असुन, जागतिक वारश्यांच्या स्मारकांच्या यादीतही तिचा समावेश झाला आहे.

औरंगाबाद शहरापासुन सुमारे ९९ किमी अंतरावर, सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये अजिंठा गाव वसले आहे. येथील तीस गुफांनी विशालकाय घोड्याच्या नालेसारखा आकार धारण केला आहे. यापैकी काही गुंफांमध्ये अंतर्गत दालनेही आहेत. अखंड पाषाणातील या गुंफा, केवळ छीन्नी-हातोडीच्या सहाय्याने, त्याचबरोबर बुध्दवादावरील श्रद्धेतून आणि प्रेरणेतुन निर्माण झाल्या. बौध्द भिक्षुंना राहण्यासाठी आणि अध्ययनाचे काम करण्यासाठी कारागिरांनी येथे चैत्य (दालने) व विहार (वसतिस्थाने) खोदुन काढले. चैत्यांमध्ये त्यांची प्रार्थना चालत असे. येथील बहुतेक गुहांच्या भिंतींवर, खांबांवर आणि प्रवेशद्वारा वर सविस्तर कोरीव काम आढळते. भिंतींवर भलीमोठी भित्तीचित्रेही आहेत. येथील तीस गुहा निर्माण करण्यासाठी सहाशे वर्षांचा कालखंड खर्ची पडला. तत्कालीन वेशभुषा, केशभुषा, दागदागीने, वस्त्रे, संगीत साधने, चालीरीती आणि स्थापत्यशास्त्राचे तपशीलवार विवेचनही त्यातून मिळते. भारतीय अभिजात कलेच्या या संकलनातून एक विशिष्ट शैली निर्माण झाली. बुध्दवादाबरोबरच तिचा हा प्रचार व प्रसार जगाच्या वेगवेगळ्या भागात झाला. अशाच प्रकारची चित्रे श्रीलंकेतील सिगिरीया,अफगाणिस्तानातील बामियान आणि तिबेट, नेपाळ, चीन, जपान येथील मंदीरांमध्ये व धार्मिक स्थळांमध्ये पहावयास मिळतात.गुहांच्या काळोख्या उदरात इतकी विस्तृत चित्रे आणि बारकाईचे कोरीवकाम करणे तत्कालीन कारागिरांना कसे साध्य झाले असावे असा प्रश्न बहुतेक पर्यटकांना पडतो.दिवसातील काही ठराविक वेळात या गुहा नैसर्गिक सूर्यप्रकाशात उजळुन निघतात, यात याचे गुपीत दडले असावे. शिवाय, गुहांचा अंतर्भाग प्रकाशीत करण्यासाठी, धातुंचे आरसे आणि पांढऱ्या रंगाचे पडदे यांचा वापर झाला असावा असेही मानले जाते.

इथल्या काही गुंफा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. २६ क्रमांकाच्या गुंफेत मोठमोठ्या, सुंदर मूर्ती आढळतात; पण त्यातील रंगीत भित्तीचित्रे अपूर्णावस्थेत आहेत. १९ क्रमांकाच्या गुंफेच्या विस्तीर्ण दर्शनी भागात धनुष्याकृती गवाक्षे ओळीने पहायला मिळतात.येथे एक संपूर्ण चैलगृह असुन त्याच्या एका टोकाला उभी बुद्धमूर्ती आहे. येथील बैठी नागराजाची मूर्ती आणि त्याच्या सोबत असलेली स्त्री दासी विशेष नोंद घेण्याजोगी आहे. सोळा क्रमांकाची गुंफा हे एक मोठे विहार आहे. तीत गुंफा बनविणाऱ्या राजाची आणि मंत्र्यांची नावे कोरली आहेत. उपदेश करण्यात मग्न असलेली विशाल बुद्धमूर्ती येथे पाहता येते. त्याच्या आजुबाजुला चवऱ्या ढाळणाऱ्या दासीही आहेत. १, २, १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफांमधील भित्तीचित्रांना कोणतीही हानी न पोहोचल्याने तेथील चित्रे सुस्पष्ट व सजीव वाटतात. प्रथम क्रमांकाच्या गुंफेत असलेले विख्यात बोधीसत्व पद्मपाणी म्हणजे कोमल दयेचे अदभूत रेखाचित्रण आहे. येथील सुंदर मूर्तीच्या नाजुक हातात कमलपुष्प दिसते. याच गुंफेत अवालोकितेश्वराची सुवर्णमूर्ती पहायला मिळते. ती दागदागीन्यांनी अक्षरशः मढलेली आहे. त्यातील स्त्रिया, राजकुमारी, दासी सगळ्याच शोभिवंत असुन त्यांचे पोषाखही कलात्मक आहेत. नृत्यमग्न ललना आणि वादक यांचा सजीव देखावाही येथे आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या गुंफेत राणी माया हिच्या स्वप्नाचा सविस्तर वृत्तांत चित्रित केला आहे. त्यात शुभ्र हत्ती प्रकर्षाने उठुन दिसतात. शाही ज्योतीष्यांनी या स्वप्नाचा संबंध तेजस्वी पुत्राच्या जन्माशी लावल्याचेही कळते. या गुंफेत अनेक बुद्धमूर्ती ओळीने मांडल्या आहेत.

१७ क्रमांकाच्या गुंफेत आकाशात विहार करणारी अप्सरा असुन तिच्या पोषाखावर नाजुक कलाकुसर आणि अंगावर अनेक दागदागीने दिसतात. या गुम्फांपासून काही अंतर चालत गेल्यावर घोड्याच्या नालेच्या आकारात एक खिंड दिसते. येथेच नाविन्यपुर्ण जलव्यवस्था केली आहे. त्यातून भिक्षुंना आणि त्यांच्या अनुयायांना पाणीपुरवठा होत असावा. अजंठा प्राचीन व्यापारी तटमार्गावर वसलेले असल्याने तेथे बऱ्याच उलाढाली होत असाव्यात आणि बरेच प्रवासीही येथे येत असावेत . त्या काळातील लोकजीवन कसे होते, याची खरेतर कोणालाच कल्पना नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार त्याचा अर्थ लावतो. अजंठाविषयी वाटणाऱ्या गूढ आकर्षणाचे कदाचित हे देखील एक कारण असेल. औरंगाबाद हे अजिंठापासून सगळ्यात जवळचे विमानतळ. ते येथून १८० किमी अंतरावर आहे. ५८ किमीवरील जळगाव रेल्वे स्टेशनही येथे जाण्यासाठी सोयीचे आहे. औरंगाबाद आणि जळगावपासुन राज्य परिवहनच्या बसची त्याचप्रमाणे लक्झरी बसचीही सोय आहे.

