गंभीरने घालून दिला आदर्श- कामवाल्याबाईंचा केला अंत्यसंस्कार


फोटो साभार भास्कर
टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज आणि आता खासदार गौतम गंभीर याने करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊन मध्ये माणुसकीचा परीचय करून दिला आहे. त्याच्या या कृतीचे सोशल मीडियावर विशेष कौतुक केले जात आहे. गंभीर यांच्या घरी काम करणाऱ्या सरस्वती पात्रा यांचे नुकतेच निधन झाले. त्या मूळच्या ओरिसाच्या आहेत. मात्र लॉकडाऊन मुळे त्यांचा परिवार अंत्यसंस्कार करण्यासाठी येऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन गौतम गंभीर यानेच त्यांचे अंत्यसंस्कार विधी केले. त्याने ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजलीही दिली आहे.

सरस्वती गेली ६ वर्षे गंभीर यांच्या घरी काम करत आहेत. गेले काही दिवस त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने सर् गंगाराम हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले होते तेथेच त्यांचे निधन झाले. तेव्हा गौतम यांनी लॉकडाऊन लक्षात घेऊन अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. गौतम म्हणाला सरस्वती माझ्या परिवाराचा एक भाग होत्या. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे हे माझे कर्तव्य होते. आपल्या देशाची परंपरा हेच सांगते की जात, धर्म, पंथ, सामाजिक प्रतिष्ठा यांची पर्वा न करता काम करायला हवे कारण त्यातूनच चांगला समाज निर्माण होत असतो.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या कृत्यासाठी गौतमचे आभार मानले आहेत. धर्मेंद्र प्रधान ओरिसाचे आहेत. ते म्हणाले सरस्वती आजारी असताना तिची देखभाल आणि तिच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार करून गौतमने कर्तव्य पूर्ती केली आहे. त्याचे हे कृत्य उपजीविकेसाठी घरापासून दूर राहून जे काम करतात त्या लाखो गरीब लोकांमध्ये मानवतेबद्दलचा विश्वास वाढवेल.

Leave a Comment