लडाखमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाला कोरोनाची लागण


नवी दिल्ली – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असतानाच देशातीली कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभरी पार झाला आहे. त्यातच आता लडाख येथे कार्यरत असणाऱ्या ‘भारतीय लष्करा’च्या जवानालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थने दिले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण जवानाच्या वडिलांना झाली होती. त्यांची देखभाल करताना, जवानालाही कोरोनाची लागण झाली. देशात प्रथमच जवानाला कोरोनाची लागण झाली आहे.

इराणला या जवानाचे वडील गेले होते. त्यानंतर 27 फेबृवारीला ते भारतात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना लडाख येथील हर्ट फॉउंडेशन येथे 29 फेबृवारीपासून क्वारंटाईन (देखरेखीखाली) करण्यात आले. त्यांची चाचणी केल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

याच काळात म्हणजे 25 फेबृवारी ते 1 मार्चपर्यंत जवानही सुट्टीवर गेला होता. त्यानंतर 2 मार्चला पुन्हा कर्तव्यावर रूजू झाला. दरम्यान, त्याने आपल्या वडिलांची सेवासुश्रुषा केली होती. जवानालाही 7 मार्चला क्वारंटाईन करण्यात आले. 16 मार्चला कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर एसएनएम या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता, जवानाचे संपूर्ण कुटुंब एसएनएम या रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Leave a Comment