कोरोनाग्रस्त महिलेने केला बंगळुरूवरून विमान प्रवास, केली दिल्ली-आग्रा रेल्वे यात्रा

बंगळुरू येथील गुगलच्या कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्याच्या 25 वर्षीय पत्नीला देखील कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे जोडपे इटलीहून हनिमूनवरून परतले होते. पतीमध्ये कोरोनाचे लक्षण दिसल्यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर 8 मार्चला महिला बंगळुरूवरून विमानाने दिल्ली पोहचली व तेथून प्रवास करत आग्र्याला आपल्या पालकांकडे गेली.

आरोग्य अधिकारी या महिलेच्या घरी गेल्यानंतरही त्यांना विरोध सहन करावा लागला. ती महिला 8 सदस्यांसोबत घरात राहत होती. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि पोलिसांमुळे अखेर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले.

महिलेने फेब्रुवारी महिन्यात बंगळुरू येथील एका गुगल कर्मचाऱ्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर हे जोडपे हनिमूनसाठी आधी इटली आणि त्यानंतर ग्रीस व फ्रान्सला गेले होते.

तेथून परतल्यानंतर 7 मार्चला महिलेच्या पतीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर महिला 8 मार्चला आग्र्याला आपल्या पालकांकडे निघून गेली होती.

या महिलेला देखील कोरोनाचा संसर्ग झाला असून, तिला एस एन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या महिलेने प्रवास केल्याने तिच्या आजूबाजूच्या प्रवाशांना देखील याची लागण झाल्याची शक्यता आहे.

Leave a Comment