आयपीएल : बक्षीसाच्या रक्कमेत बीसीसीआयकडून कपात

बीसीसीआयने इंडियन प्रिमियर लीगच्या आगामी सत्रात अनेक खर्चात कपात करताना विजेत्या व उपविजेत्या संघाला दिल्या जाणाऱ्या बक्षीसाची रक्कम 2019 च्या तुलनेत अर्धी केली आहे. बीसीसीआयने एका जारी केलेल्या सर्क्युलरमध्ये याची माहिती दिली आहे.

यानुसार, विजेत्या संघाला 20 कोटींच्या ऐवजी 10 कोटी रुपये, उपविजेत्या संघाला 12 कोटी 50 लाख रुपयांच्या ऐवजी 6 कोटी 25 लाख रुपये मिळतील. क्वॉलिफायरमध्ये हरणाऱ्या दोन्ही संघाना प्रत्येक 4 कोटी 37 लाख 50 हजार रुपये मिळतील.

बीसीसीआयच्या सुत्रांनुसार, सर्व फ्रेंचाईजींची स्थिती चांगली असून, ते प्रायोजकांद्वारे आपले उत्पादन वाढवू शकतात. याच कारणामुळे बक्षीसाच्या रक्कमेत कपात करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त आयपीएल सामन्यांचे आयोजन करणाऱ्या राज्य संघटनांना एक कोटी रुपये मिळतील. यात बीसीसीआय आणि फ्रेंचाईजी दोघेही प्रत्येकी 50 लाख रुपये देतील. याशिवाय बीसीसीआयच्या मध्य स्तरीय कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी जेथे 8 तासांपेक्षा कमी उड्डाण असेल, तेथे बिझनेस क्लासचे तिकीट मिळणार नाही.

Leave a Comment