तुमचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी आता फेसबुक देणार पैसे

स्मार्ट स्पीकरद्वारे वॉइस रेकॉर्डिंग केले जात असल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात आलेल्या आहेत. मात्र आता फेसबुकने वॉइस रेकॉर्ड करण्यासाठी एक अधिकृत प्रोग्राम प्रोनाउंसिएशंस (Pronunciations) लाँच केला आहे. या प्रोग्राम अंतर्गत युजर्सला वॉइस रेकॉर्डिंगसाठी फेसबुककडून पैसे दिले जाणार आहेत. या प्रोग्रामच्या मदतीने फेसबुक आपल्या स्पीच रिकॉग्निशन टेक्नोलॉजीला अधिक चांगले करणार आहे.

फेसबुकचा हा प्रोग्राम कंपनीच्या व्ह्यू प्वाइंट मार्केट रिसर्च अ‍ॅपवर उपलब्ध आहे. या प्रोग्रामसाठी तुम्हाला एक टेस्ट देखील द्यावी लागेल. यात पास झाल्यावर तुम्ही या प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकता. सुरुवातीला तुम्हाला या प्रोग्राममध्ये फेसबुकवरील तुमच्या फ्रेंडलिस्टमधील एक नाव बोलून रेकॉर्ड करावे लागेल. त्यानंतर अशाच प्रकारे 10 मित्रांची नावे रेकॉर्ड करावी लागतील.

रेकॉर्डिंगचा एक सेट पुर्ण झाल्यावर तुम्हाला फेसबुक कडून 200 प्वाइंट मिळतील. 1000 प्वाइंट झाल्यावर तुम्हाला पेपलद्वारे 5 डॉलर म्हणजेच जवळपास 360 रुपये  मिळतील. मात्र 1000 प्वाइंट झाल्यावरच तुम्हाला पैसे काढता येतील.

फेसबुकचा हा प्रोग्राम सध्या केवळ अमेरिकेतच उपलब्ध असून, 18 वर्षांवरील युजर्स यामध्ये भाग घेऊ शकतात. या प्रोग्रामबाबत फेसबुकने स्पष्ट केले आहे की, वॉइस रेकॉर्डिंगसाठी युजर्सच्या प्रोफाइलला कनेक्ट केले जाणार नाही.

Leave a Comment