आयबीएमच्या सीईओपदी भारतीय वंशाचे अरविंद कृष्णा

आंतरराष्ट्रीय कॉम्प्युटर हार्डवेअर कंपनी आयबीएमच्या सीईओपदी भारतीय वंशाचे अरविंद कृष्णा यांची निवड झाली आहे. ते सध्याच्या सीईओ वर्जिनिया रोमेटी यांची जागा घेतील. आयबीएमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी अरविंद कृष्णा यांची सीईओपदी निवड केली असून, ते 6 एप्रिलपासून पदभार स्विकारतील. कृष्णा हे सध्या क्लाउड आणि कॉग्निटिव्ह सॉफ्टवेअरसाठी आयबीएममध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.

57 वर्षीय कृष्णा यांनी वर्ष 1990 मध्ये आयबीएममध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले असून, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये यूनिवर्सिटी ऑफ इलिनोइसमधून पीएचडी केली आहे.

कृष्णा म्हणाले की, आयबीएमचा सीईओ म्हणून माझी निवड झाल्याबद्दल मी उत्साही असून, बोर्डाने माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील सर्वोच्च पदावर पोहचण्याच्या भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या यादीत अरविंद कृष्णा यांच्यामुळे आणखी एक नाव जोडले गेले आहे. या यादीत मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला, गुगल आणि अल्फाबेट सीईओ सुंदर पिचाई, मास्टकार्ड सीईओ अजय बांगा, पेप्सीकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी आणि एडॉबी सीईओ शंतनू नारायण यांच्यासह आता अरविंद कृष्णा यांचा देखील समावेश झाला आहे.

सध्याच्या सीईओ वर्जिनिया रोमेटी या वर्षाअखेर निवृत्त होणार असून, त्यापर्यंत त्या कंपनी बोर्डच्या एक्झिक्यूटिव्ह चेअरमन  म्हणून कार्यरत असतील. त्यांनी देखील ‘आयबीएममध्ये पुढील काळासाठी योग्य सीईओ’, असे म्हणत कृष्णा यांचे कौतूक केले.

कृष्णा यांच्या व्यतरिक्त सध्याचे रेड हॅटची सीईओ आणि आयबीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेम्स व्हाइटहर्स्ट यांची देखील आयबीएमचे अध्यक्ष म्हणू निवडण्यात आले आहे.

Leave a Comment