देशातील सर्वात स्वच्छ शहराची कचऱ्यापासून 4 कोटींची वार्षिक कमाई

स्वच्छ सर्वेक्षणात मध्यप्रदेशमधील इंदौर शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला आहे. हे शहर कचऱ्यापासून वर्षाला 4 कोटी रुपये कमवत असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मागील 3 वर्ष सतत इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.

इंदौर महानगरपालिकेचे सल्लागार असद वारसी यांनी सांगितले की, खाजगी कंपनीने सार्वजनिक खाजगी भागिदारी मॉडेल अंतर्गत 30 कोटींची गुंतवणूक करून आर्टफिशिअल इंटेलिजेंसवर चालणारे स्वंयचलित कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र लावले आहे. या यंत्राद्वारे दरदिवशी 300 टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे याचे सेंसर सुक्या कचऱ्याला निवडून वेगळे करते.

प्रक्रियेनंतर सुक्या कचऱ्यातून काच, प्लास्टिक, कागद, धातू इत्यादी गोष्टी वेगवेगळ्या बंडल्समध्ये बाहेर येतात. या यंत्रासाठी महानगरपालिकेने 4 एकरची जमीन दिली आहे. जमिनी व्यतरिक्त महानगरपालिकेने कोणतीही गुंतवणूक केलेल नाही. मात्र करारा अंतर्गत या कचऱ्याद्वारे होणाऱ्या उत्पन्नातील वर्षाला 1.51 कोटी रुपये महानगरपालिकेला देण्याचे निश्चित झाले आहे.

वारसी यांनी सांगितले की, ओल्या कचऱ्यावर प्रक्रियाकरून त्यातून खत आणि बायो सीएनजी इंधन तयार केले जात आहे. याशिवाय जुन्या इमारती पाडल्यानंतर राहिलेल्या ढिगाऱ्यापासून वीट, इंटरकॉलिंग टाइल्स आणि अन्य वस्तूंची निर्मिती केली जात आहे.  या सर्व वस्तूंच्या विक्रीतून महानगरपालिकेला वर्षाला 2.5 कोटींची कमाई होत आहे.

35 लाख लोकसंख्या असलेल्या इंदौरमध्ये दररोज 1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. यामध्ये 550 टन ओला कचरा आणि 650 टन सुका कचरा आहे.

Leave a Comment