
नवी दिल्ली – आज पहाटे 3 च्या सुमारास पशुवैधक डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याकांडातील चारही आरोपी पोलीस एनकाऊंटरमध्ये ठार करण्यात आले. या आरोपींना अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना त्यावेळी थांबवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यावेळी गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता हैदराबाद पोलिसांच्या एनकाऊंटरवर एमआयएमचे प्रमुख आणि खासदार अससुद्दीन ओवैसी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हैदराबाद पोलिसांच्या एनकाऊंटरवर ओवैसी यांचे प्रश्नचिन्ह
ही चकमक चुकीची असून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील वृंदा ग्रोवर यांनी केली होती. त्यानंतर ओवैसी यांनी आता याप्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे या चकमकीचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नावाचाही उल्लेख केला. जनावरासारखे हे लोक झाले असून यावर तात्पुरता उपाय करायला नको. महिलांच्या सुरक्षेसाठी अनुकुल वातावरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे यापूर्वी मुख्यमंत्री म्हणाले.
