थंडीसाठी लेदर जॅकेट घेताना घ्या ही काळजी


हळू हळू थंडीची सुरवात होऊ लागली असून आता गरम कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु होईल. विंटर फॅशन मध्ये अगदी ९० च्या दशकापासून किंबहुना त्यापूर्वी पासूनही कायम लोकप्रिय राहिलेला ट्रेंड म्हणजे लेदर जॅकेट्स. काही काळापूर्वी पुरुष वर्गाची या क्षेत्रात असलेली मक्तेदारी आता महिला वर्गाने मोडीत काढल्याचे आणि महिलांसाठीची विविध प्रकारची लेदर जॅकेट बाजारात उपलब्ध असल्याचे दिसून येते. कॉलेज, ऑफिस, कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जाताना आजची पिढी लेदर जॅकेटचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना पाहायला मिळते. ही जॅकेट अन्य जॅकेटच्या तुलनेत महाग असतात आणि त्यामुळे त्यांची खरेदी करताना काही काळजी जरूर घ्यायला हवी.


सध्या बायकर स्टाईल तसेच बॉम्बर जॅकेट्सची चलती अधिक असली तरी क्लासिक लेदर जॅकेटची मागणी टिकून आहे. स्टाईल कोणतीही असली तरी खरेदी करताना या गोष्टी नक्की जाणून घ्यायला हव्यात. लेदर जॅकेट नेहमी शरीराला फिट बसणारे हवे. ते सैल असेल तर त्याच्या बाह्या उचलल्या जातात आणि लुक बिघडतो. त्यामुळे आपल्या साईजनुसार जॅकेट निवडावे. लेदरची क्वालिटी हा महत्वाचा मुद्दा आहे कारण कमी प्रतीचे लेदर असेल तर पैसा वाया जातो. लेदर मध्ये फसवाफसवी खूप होते त्यामुळे खरेदी करताना या लेदरला अन्य कोणताही वास येत नाही याची खात्री करून घ्या आणि शक्यतो ब्रांडेड जॅकेटला प्राधान्य द्या.

जॅकेट झिपवाले हवे का बटणे असलेले हे अगोदर ठरवा. झिप असलेले जॅकेट अधिक उब देते मात्र आत घालायचा कपडा नाजूक असेल तर एखादेवेळी झिप मुळे तो खराब होऊ शकतो. बटणे असलेले जॅकेट खूप थंडी नसेल तर अधिक चांगले कारण दोन बटणांच्या मध्ये थोडी फट राहते व त्यामुळे आत थोडी हवा खेळती राहते. ही जॅकेट्स जीन्स बरोबर अधिक खुलतात. सध्या बॉम्बरची क्रेझ आहे पण बायकर जॅकेट्सना ही चांगली मागणी आहे. स्वेट शर्ट किंवा टीशर्टसह ही जॅकेट अधिक शोभतात.

Leave a Comment