कथा महाविकास आघाडीच्या जन्माची


मुंबई – राज्यातील सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला पुर्णविराम लागला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आता कामालाही लागले आहे. पण, त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तानाट्यामागील अनेक घटनांवरचे पडदे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत दूर केले आहेत. पवारांनी त्यात शिवसेना आणि काँग्रेसला सोबत एकत्र कसे आणले याचे उत्तर देखील दिले आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुलाखत दिली आहे. पवार यांनी राज्यात उदयास आलेल्या महाविकास आघाडीच्या जन्माची गोष्ट या मुलाखतीत सांगितली.

शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष वेगळ्या विचारांचे आणि विरोधी पक्ष होते. मग, शिवसेनेसोबत काँग्रेस कशी आली, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, ज्यावेळी सत्तास्थापन करण्यासंदर्भात राज्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी शिवसेनेकडून पहिल्यांदा असे सांगण्यात आले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत येण्यास शिवसेना तयार आहे. आम्ही त्यानंतर एकत्र येण्याची चर्चा सुरू केली. काँग्रेसला सोबत घेण्याविषयी तयार करणे यात गरजे होते. पण, आतापर्यंत कायम विरोधी भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेसोबत कसे जायचे, असे काँग्रेसचे म्हणणे असल्याचे पवार म्हणाले.

त्यानंतर मी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत बोलणे केले. त्याबैठकीत शिवसेनेसोबत काँग्रेसने यायला हवे. महाराष्ट्रात परिवर्तन होऊ पाहत असल्यामुळे त्यांनी हे समजून घेतले पाहिजे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने त्यांना तीन गोष्टी सांगितल्या.

पहिली गोष्ट म्हणजे आणीबाणीची. सोनिया गांधींना मी म्हणालो, इंदिरा गांधी यांनी ज्यावेळी सत्ता हातात असताना आणीबाणी लागू केली. त्यांचा त्यावेळी सर्वांनीच विरोध केला. फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी अशा काळात आणीबाणीला पाठिंबा दिला होता. तो पहिला पाठिंबा होता. त्यांना दुसरी गोष्ट सांगितली की, ज्या निवडणुका आणीबाणीनंतर झाल्या त्यात बाळासाहेबांनी एकही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली.

पक्षाचे अस्तित्व ज्या निर्णयाने धोक्यात येण्याची शक्यता होती. बाळासाहेबांनी तरीही टोकाचा निर्णय घेतला. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार होते. त्यावेळी काँग्रेसने माझ्यावर शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी जबाबदारी सोपवली होती. बाळासाहेबांना मी भेटलो. बाळासाहेबांच्या भेटीसाठी प्रतिभाताई आणि प्रणव मुखर्जी यांना घेऊन गेलो. त्यावेळी शिवसेनेने ‘एनडीए’त असताना सुद्धा काँग्रेसला पाठिंबा दिला. हे सोनिया गांधींना मी सांगितल्यानंतर शिवसेनेसोबत येण्यास काँग्रेस तयार झाल्याचे शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितले.

Leave a Comment