
नागपुर – स्थानिक न्यायलयाकडून २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावण्यात आले आहे. गुरूवारी फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स नागपूर पोलिसांनी पाठवले आहे. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतानाच, दुसरीकडे हे समन्स माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहचले होते.
फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना समन्स
१ नोव्हेंबर रोजी, याप्रकरणाबाबत दंडाधिकारी न्यायालयाकडे खुलासा न केल्याच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई करण्याचा अर्ज दाखल झाला होता. फडणवीस यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई सुरू करावी, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात वकील सतीश उके यांनी दाखल केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने या अगोदर उके यांची याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा पूर्वीचा आदेश कायम ठेवला होता. पण, १ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवत सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांच्याविरोधातील तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने हा खटला सारांश फौजदारी खटला म्हणून ठेवला जाईल असे सांगत नोटीस बजावली.
वकील उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. फडणवीस यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्य़ांची माहिती लपवण्यात आली. खोटे प्रतिज्ञापत्र फडणवीस यांनी सादर केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.
