जास्त दिवस टीकणार नाही महाविकासआघाडीचे सरकार – गडकरी


नवी दिल्ली : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची राज्यातील महाविकासआघाडी जवळपास निश्चित झाली असून त्यादिशेने हालचाली देखील सुरु झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. पण याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकीर यांनी एक भाकीत वर्तवले आहे. महाविकासआघाडीचे सरकार हे जास्त दिवस टीकणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सहा ते आठ महिन्यांपेक्षा जास्त या तीन पक्षांचे संधीसाधू सरकार टिकणार नसल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली.

देशाची मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहणे हा गुंतवणुकीच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा मानला जातो. याकडेही गडकरींनी लक्ष्य वेधले. या तीन पक्षांमध्ये विचारधारेचे अंतर असल्यामुळे हे सरकार टिकणार नाही आणि महाराष्ट्राला अस्थिर सरकार परवडणारे नसल्याचेही गडकरी म्हणाले.

शिवसेनेशी भाजपची युती ही विचारधारेच्या आधारावर होती आणि आमची विचारधारा आजही समान आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची विचारधारा विरोधी आहे. विचारधारेच्या आधारावरील युती तोडणे हे देशासाठी आणि हिंदुत्वासाठी अयोग्य आहे, ज्याचा महाराष्ट्रालाही तोटा होईल, असे गडकरी म्हणाले.

गडकरींनी हे भाकीत महाराष्ट्रात सत्तास्थापनेविषयीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात एकमत झाले आहे. आता सत्तास्थापनेचा फॉर्म्युला आणि किमान समान कार्यक्रम तीन पक्षांकडून पत्रकार परिषद घेऊन कधीही जाहीर केला जाऊ शकतो.

Leave a Comment