
बंगळुरू – काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत संसार थाटण्यापेक्षा भाजपसोबत हातमिळवणी करुन सरकार स्थापन करावे असे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. कुमारस्वामी यांच्या मते, भाजपच्या तुलनेत शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा अधिक कट्टर असल्यामुळे, शिवसेनेला सोबत न घेता काँग्रेसने भाजपलाच मित्र बनवायला हवे असेही म्हटले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित येऊन सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांचा सल्ला सूचक मानला जात आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रात भाजपसोबत संसार थाटावा – एचडी कुमारस्वामी
एच.डी. कुमारस्वामी पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात 1/2 फर्मुल्यावर विचार केला जाऊ शकतो. तरीही 1/3 असा फॉर्मुला काँग्रेस का वापरत आहे. भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा सौम्य आहे. तर शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी आहे. काँग्रेस एक कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत हात मिळवणी करत आहे. काँग्रेसने त्यापेक्षा थेट भाजपसोबत जायला हवे. त्यांचे हिंदुत्व सौम्य आहे आणि भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापित करणे अधिक सोपे आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे 24 ऑक्टोबर रोजी निकाल लागले. यामध्ये एकत्रित निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. तरीही मुख्यमंत्री पदावर एकमत होऊ न शकल्याने त्यांनी सरकार स्थापित केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सुद्धा यानंतर त्यात अपयशी ठरले आणि राज्यात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. बहुमत सिद्ध करण्यासाठी 288 जागांपैकी 145 जागा हव्या आहेत. निकालानंतर भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन सरकार स्थापनेच्या चर्चा करत आहेत.
