
मुंबई : 15 दिवस विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून उलटलेले असले तरीही सत्ता स्थापनेचा राज्यातील तिढा अद्यापही कायम आहे. आज (8 नोव्हेंबर) जर काही निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता आहे. याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री सरकारी गाड्या आणि इतर सुविधा आज संध्याकाळपर्यंत परत करु शकतात. सध्या पूर्णत: शिवसेना आणि भाजपमधील संवाद बंद आहे, परिणामी सत्ता स्थापनेबाबत कोणताही तोडगा निघत नाही.
आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात फडणवीस
अवघे काही तास तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला शिल्लक आहेत. 10 नोव्हेंबर 2014 रोजी तेरावी विधानसभा ही अस्तित्त्वात आली होती. पाच वर्षे 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत असल्याने विधानसभेचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार आहे. घटनात्मक तरतुदीनुसार त्यापूर्वी नवे सरकार अस्तित्त्वात येणे आवश्यक आहे. अवघे काही तासच सरकारचा कार्यकाळ संपण्यास शिल्लक असल्यामुळे उर्वरीत कालावधीत जर नवे सरकार अस्तित्वात आले नाही तर, घटनात्मक पेच निर्माण होणार असल्यामुळे एक तांत्रिक बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात.
