ड्रोनच्या सहाय्याने प्रथमच होणार भारताचे मॅपिंग


सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे एसओआय तर्फे प्रथमच देशाचे अचूक आणि तपशीलवार मॅपिंग करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. या संदर्भात जारी केलेल्या अहवालानुसार ड्रोनच्या सहाय्याने मॅपिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यासाठी ३०० ड्रोन वापरली जाणार असून जमिनीचे हाय रेझोल्युशन नकाशे तयार करणे शक्य होणार आहे.

सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रमुख गिरीशकुमार या संदर्भात म्हणाले, संस्थेने नेहमीच बारीक सारीक तपशील पुरविणारे नकाशे तयार करण्यास प्राधान्य दिले आहे. यापृवी एरियल फोटोग्राफीचा वापर केला गेला आहे. पण हे तंत्रज्ञान महाग आहे आणि त्याला काही मर्यादा आहेत. ड्रोनच्या सहाय्याने अधिक अचूक आणि तपशीलवार नकाशे तयार करणे शक्य असून दोन वर्षात ७५ टक्के भूभागाचा म्हणजे ३.२ दशलक्ष चौरस किलोमीटरचा नकाशा तयार करणे शक्य आहे.

यासाठी ३०० ड्रोन खरेदी केली असून हरियाणाचे सहा जिल्हे, कर्नाटकचे दोन आणि महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यांशी या संदर्भात करार केले गेले आहेत. यात प्रत्येक चौरस किमीसाठी २५०० चित्रे काढली जाणार आहेत. ड्रोनच्या सहाय्याने नकाशे बनविताना संवेदनशील तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या जागांचे चित्रण केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment