
मुंबई : रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. शास्त्री यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच ऋषभ पंतला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जबाबदारी दाखव, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. याआधीही पंतवर खराब शॉट खेळून आऊट झाल्यामुळे मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली होती. कौशल्य असो वा नसो, ऋषभ पंत असे शॉट खेळून फक्त स्वत:लाच नाही, तर टीमलाही निराश करत असल्याचे शास्त्री म्हणाले.
शास्त्रीबुवांचा ऋषभ पंतला निर्वाणीचा इशारा
पंत वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये फॅबियन एलनच्या बॉलिंगवर पहिल्याच बॉलला मोठा शॉट मारायच्या नादात आऊट झाला. शास्त्रींनी या शॉटवर नाराजी व्यक्त केली आहे. कर्णधार तुमच्यासोबत खेळत आहे आणि तुम्ही आव्हानाचा पाठलाग करत आहात, अशावेळी समंजसपणा दाखवून खेळणे गरजेचे असल्याचे वक्तव्य शास्त्रींनी केले. पंत वेस्ट इंडिज दौऱ्यात दोनवेळा पहिल्या बॉलवर आऊट झाला. पंतला पहिल्या टी-२०मध्ये सुनिल नारायणच्या बॉलिंगवरही भोपळा न फोडता माघारी परतावे लागले होते. कोणीही पंतची बॅटिंग स्टाईल बदलणार नाही, पण मॅचची परिस्थिती पाहून योग्य रणनिती आखत खेळणे गरजेचे असल्याचे शास्त्रींनी सांगितले. या चुकांमधून ऋषभ पंत शिकेल, त्याने बऱ्यापैकी आयपीएल मॅच खेळल्या आहेत, असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला.
