भारतीय गुप्तचर संस्था आयबीने राजस्थान जवळील भारत-पाकिस्तान सीमेवरील पाक सैन्याच्या हालचाली संबंधी सरकारला अलर्ट केले आहे. आयबीचे म्हणणे आहे की, पाकिस्तान भारताच्या विरोधात मोठे षडयंत्र रचत आहे.
पाककडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरची गुप्तपणे सुटका
आयबीनुसार, पाकिस्तान सियालकोट – जम्मू आणि राजस्थानच्या सेक्टरमध्ये काहीतरी मोठे करण्याची योजना तयार करत आहे. केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने पाकिस्तान हे करणार असल्याचे सांगितले जात आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सीमा सुरक्षा दल आणि जम्मू व राजस्थानमधील तैनात सैन्याला याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोन्ही देशातील तणावाबद्दल म्हणाले होते की, पाकिस्तानला युध्द नको आहे. मात्र त्याआधी पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल कमर बाजवाने आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तयार असल्याचे म्हटले होते.
आयबीनुसार, पाकिस्तानने गुप्तपणे जैश ए मोहम्मदचा प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरची जेलमधून सुटका केली आहे. मसूद अजहर आतंकवादी संघटनेबरोबर मिळून भारतावर आतंकवादी हल्ला करण्याची योजना तयार करत असल्याचे आयबीकडून सांगण्यात आले आहे.
