टी 20 क्रिकेट विश्वचषकावर भारतीय दिव्यांग संघाने कोरले नाव


लंडन : यजमान इंग्लंडला पराभूत करून दिव्यांग टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने विजतेपद पटकावले. रवींद्र संतेचे अर्धशतक आणि कपणाल फणसे यांच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारताकडून रवींद्र संतेने 53 धावा तर कुणाल फणसेने 36 धावांची खेळी केली. इंग्लंडच्या लिआम ओब्रायनने 35 धावांत 2 गडी बाद केले. इंग्लंडचा संघ भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंत मजल मारू शकला.

भारताने सुरुवातीलाच यजमान इंग्लंडला दणका दिला. सलामीवीर जेमी गुडविन 17 धावांवर बाद झाला. सनी गोयतने त्याला बाद केल्यानंतर अँगुस ब्राऊन आणि कॅलम फ्लीन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. ही जोडीसुद्धा सनीनेच फोडली. त्यानंतर कुणालने इंग्लंडचे दोन फलंदाज एकाच षटकात बाद केले. पहिल्या दोन विकेट गमावल्यानंतर इंग्लंडची घसरगुंडी उडाली. त्यांचे 9 गडी 129 धावांत तंबूत परतले होते. पण शेवटच्या जोडीने सावध खेळ करत विजय लांबवला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताच्या रवींद्रनं 34 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. यात 4 षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. त्यानंतर कुणाल फणसे आणि विक्रामत केणी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 67 धावांची भागिदारी केली. कुणालनं 36 तर विक्रांतनं 29 धावा केल्या. अखेरच्या षटकात सुग्नेश महेंद्रनने 11 चेंडूत 4 षटकारांच्या सहाय्यानं 33 धावांची वेगवान खेळी केली.

उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने दिलेले 151 धावांचे आव्हान भारताने 2 गडी राखून पार केले होते. या सामन्यात कुणाल फणसेने अर्धशतकी खेळी केली होती.

Leave a Comment